मुंबईतील हजारो गुंतवणूकदारांना 60 कोटींचा फटका;आकर्षक परताव्याच्या नावाखाली फसवणूक

सकाळ न्यूज नेटवर्क 
Sunday, 17 January 2021

आकर्षक परताव्याचे प्रलोभन देऊन हजारो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रूपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे

मुंबई  : आकर्षक परताव्याचे प्रलोभन देऊन हजारो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रूपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. त्यात मुंबई आणि परिसरातील गुंतवणूकदारांचे सुमारे साठ कोटी अडकल्याचे पीडीत गुंतवणूकदारांनी स्थापन केलेल्या "आदर्श इन्व्हेस्टर्स ऍन्ड डिपॉझिटर्स वेलफेअर फोरम'च्यावतीने सांगण्यात आले. मुंबईत आर्थिक गुन्हे शाखेकडे जून 2020 मध्ये तक्रार दाखल करूनही पुढे कोणतीच कार्यवाही झाली नसल्याचे फोरमचे म्हणणे आहे. 

ठेवीदारांना आकर्षक व्याजदर आणि आमिष दाखवून कोट्यवधींच्या ठेवी घेऊन "संकल्प सिद्धी' आणि "माऊली मल्टिस्टेट को. सोसायटी'च्या संचालकांनी ठेवीदारांच्या रकमेचा अपहार करण्यात आला. याप्रकरणी कंपनीचे संचालक विष्णू भागवत यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून ते सध्या तुरूंगात आहे. भागवत यांना शिक्षा होऊनही ठेवीदारांचे पैसे मात्र परत मिळाले नसल्याचेही फोरमने म्हटले आहे. 
भागवत यांनी 5 ऑगस्ट 2015 रोजी "उज्वलम अँग्रो मल्टीस्टेट को.ऑपरेटीव्ह सोसायटी लिमीटेड' या कंपनीची स्थापना केली. मुदत ठेवी (एफडी), पेन्शन योजना, विविध प्रकारच्या ठेवी योजनांच्या जाहिरातींद्वारे गोरगरीब गुंतवणूकदारांकडून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करून घेतली. गुंतवणुकीची रितसर पावती आणि प्रमाणपत्रेही गुंतवणूकदारांना देण्यात आले. दोन वर्षानंतर माऊली मल्टीस्टेट क्रेडीट को.ऑपरेटिव्ह सोसायटी लिमीटेड कंपनीची स्थापना करण्यात आली. त्यानंतर वर्षभरात संकल्पसिद्धी प्रॉडक्‍ट इंडिया प्रा.लि, फ्लाय हॉलिडे प्रा.लि., स्काय फिलर्स, प्रॉफीट टीचर, इन्फिनिटी टुरीझम अशा 

मुंबई, रायगड ठाणे परिसरातील महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी क्लिक करा

वेगवेगळ्या कंपन्या काढून विष्णू भागवत आणि प्रफुल्ल नेस्ताने यांनी मुंबई आणि परिसरातील गुंतवणूकदारांकडून सुमारे साठ कोटी रूपयांपेक्षा अधिक रक्कम उकळली. परतावा म्हणून सुरूवातीला थोडीफार रक्कम दिली. त्यानंतर उज्वलम आणि माऊली संस्थेमधील रकमेची मुदत दोन वर्षांनी संपल्यावरही त्याचा परतावा देण्यात आला नाही. वेळोवेळी आश्वासने देत वेळकाढूपणा करण्यात आला. सध्या मुंबईतील कंपनीची कार्यालये बंद आहेत. 

हजारो गुंतवणूकदारांची फसवणूक 
दरम्यान, आदर्श इन्व्हेस्टर ऍन्ड डिपॉझिटर वेल्फेअर फोरमच्या माध्यमातून मुंबई आर्थिक गुन्हा शाखेकडे (ईओडब्ल्यू) फसवणूकीची तक्रार नोंदविली आहे. सध्या या फोरमकडे 12 हजारांपेक्षा अधिक पीडीत गुंतवणूकदारांची नोंद झाली आहे. अशाप्रकारे कोणाची फसवणूक झाली असेल, तर त्यांनी फोरमकडे संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 

हजारो लोकांची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक झाली आहे. गोरगरीब गुंतवणूकदारांचा पैसा परत कसा मिळेल, हा महत्त्वाचा प्रश्‍न आहे. 
- अनंत गोरे,
सरचिटणीस, आदर्श इन्व्हेस्टर्स ऍन्ड डिपॉझिटर्स वेलफेअर फोरम. 

60 crore hit to thousands of investors in Mumbai fraud in the name of attractive returns

-------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 60 crore hit to thousands of investors in Mumbai fraud in the name of attractive returns