तब्बल साडेसात कोटींचे रक्तचंदन मुंबईतून जप्त

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 सप्टेंबर 2019

दीड हजार किलो प्रतिबंधित रक्तचंदन सांताक्रुझ येथून जप्त करण्यात गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले. जप्त करण्यात आलेल्या रक्तचंदनाची किंमत साडेसात कोटी रुपये असून, याप्रकरणी गुन्हे शाखेच्या कक्ष-9 च्या पोलिसांनी तिघांना अटक केली.

मुंबई : दीड हजार किलो प्रतिबंधित रक्तचंदन सांताक्रुझ येथून जप्त करण्यात गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले. जप्त करण्यात आलेल्या रक्तचंदनाची किंमत साडेसात कोटी रुपये असून, याप्रकरणी गुन्हे शाखेच्या कक्ष-9 च्या पोलिसांनी तिघांना अटक केली.

असगर इस्माईल शेख (49), अली शेख(32) व वाजिद अब्बा अन्सारी (32) असे अटकेत असलेल्या आरोपींची नावे आहेत. जप्त करण्यात आलेले रक्तचंदनाचे तार चेन्नईशी जुळले असल्याचे प्राथमिक तपासात उत्पन्न झाले असून, वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथक याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

सांताक्रुझ परिसरात काही संशयित प्रतिबंधित रक्तचंदन घेऊन येणार असल्याची माहिती देसाई यांना मिळाली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संजय गावडे, आशा कोरके, सहाय्यक पोलिस निरीक्षक सुधीर जाधव, शरद धराडे यांच्या पथक सांताक्रुझ परिसरात आरोपींच्या पाळतीवर होते.

मंगळवारी सकाळी दोन संशयित टेम्पो परिसरात आल्यानंतर ते अडवण्यात आले. त्यांची झडती घेतली असता दोन टेम्पोमध्ये प्रतिबंधित रक्तचंदन असल्याचे निष्पन्न झाले. तपासणी केली असता दोन टेम्पोत मिळून एक हजार 556 किलो रक्त चंदन आरोपींकडे सापडले. त्यानुसार याप्रकरणी सांताक्रुझ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून तीनही आरोपींना अटक करण्यात आली.

जप्त करण्यात आलेल्या रक्तचंदनाची किंमत साडेसात कोटी रुपये आहे. आरोपी हे रक्तचंदन परदेशात पाठवणार होते. त्यापूर्वीच त्यांना अटक करून गुन्हे शाखेच्या कक्ष-9 च्या पोलिसांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 7 Crores 50 Thousand Red Sandalwood have been Seized in Mumbai