मुंबई, पुण्याचाच नवरा पाहिजे 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 सप्टेंबर 2019

दक्षिण रायगडमध्ये गणेशोत्सवापासूनच विवाह इच्छुक वधू-वरांसाठी सुयोग्य जोडीदार शोधायला सुरुवात करतात. परंतु नजीकच्या काही वर्षांपासून वर पिता आणि त्याच्या नातेवाईकांना वेगळाच अनुभव येत आहे. ग्रामीण भागातील विवाह इच्छुक तरुणींची अपेक्षा वाढली आहे. त्यांचा गावात राहणाऱ्या वराला नकार आहे.

माणगाव, ता. 19 (बातमीदार) : शेती, दूधदुभते, नैसर्गिक वातावरण आदी कारणांमुळे एकेकाळी तरुणींना गाव प्रिय होता. त्यामुळेच त्या शहरातील स्थळांना नकार देत होत्या. आता दक्षिण रायगडमधील चित्र झपाट्याने बदलले असून 70 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक तरुणी शहरातलाच नवरा पाहिजे, असा हट्ट करत आहेत. विशेष म्हणजे मुंबई, पुणे, ठाण्यासारख्या मोठ्या शहरात विवाह इच्छुक मुलाचे स्वत:चे घर असेल तरच लग्नाची बोलणी सुरू होते. 
दक्षिण रायगडमध्ये गणेशोत्सवापासूनच विवाह इच्छुक वधू-वरांसाठी सुयोग्य जोडीदार शोधायला सुरुवात करतात. परंतु नजीकच्या काही वर्षांपासून वर पिता आणि त्याच्या नातेवाईकांना वेगळाच अनुभव येत आहे. ग्रामीण भागातील विवाह इच्छुक तरुणींची अपेक्षा वाढली आहे. त्यांचा गावात राहणाऱ्या वराला नकार आहे. वधू पिता, नातेवाईक आणि वर मुंबई, पुणे, ठाणे किंवा अन्य मोठ्या शहरात राहतो का, असा प्रश्‍न तरुणींचा असतो. मुलाचे स्वत:चे घर आहे का? असा प्रश्‍नही त्यांचा असतो. या प्रश्‍नांची उत्तरे हो आली तरच पुढील बोलणी सुरू होते. 
दक्षिण रायगडमधील सर्वच तालुके दुर्गम आहेत. अनेक तरुण आजही गावाकडे राहून शेती, भाजीपाला पिकवतात. काही जण लहान-मोठे उद्योग करतात. मात्र, बदलत्या काळानुसार शिकलेल्या तरुणी जीवनसाथी निवडताना शहरातील राहणारा आणि त्या ठिकाणी स्वत:चे घर असलेल्या जोडीदारासाठी आग्रही असल्याचे दिसून येत आहे. यामुळे ग्रामीण भागात राहणाऱ्या विवाह इच्छुक तरुणांचे लग्न जमविताना पालकांची दमछाक होत आहे. 
अनेक पालकही मुलीचे लग्न जमविताना शहरातील राहणारा आणि स्वस्तःची खोली असणाऱ्या जावयास पसंती देत आहेत. गावात राहणाऱ्या तरुणाची आर्थिक स्थिती चांगली असली तरी लग्ने जुळण्यास अनंत अडचणींना पालकांना सामोरे जावे लागत आहे. शिक्षणाचा झालेला प्रसार आणि शहरांचे आकर्षण यामुळे ही समस्या पुढे येत असल्याचे जाणकार सांगत आहेत. 

लग्न जमवण्यासाठी अशीही युक्ती 
शहरातील नवरा पाहिजे, असे बहुतांश तरुणींना वाटते. त्यामुळे गावात राहणाऱ्या मुलाचे लग्न जमविणे हे दिव्य ठरत असल्याने विवाह इच्छुक काही तरुणांचे पालक मुलांना काही महिने शहरात राहण्यासाठी पाठवतात, असे सांगण्यात येते. 

...म्हणून शहराला पसंती 
गावात शिक्षणापासून वैद्यकीय आणि अन्य सोयी सुविधांचा अभाव आहे. रोजगाराच्या संधीही कमी आहेत. त्यामुळे सुशिक्षित तरुणी शहराला पसंती देत आहेत. पूर्वी शेतीतून चांगले उत्पन्न मिळत होते. मोठी शेतीही होती; मात्र आता या व्यवसायातही फारसा नफा मिळत नाही. वाढत्या कुटुंबांमुळे शेतीचे तुकडे पडले आहेत. त्यामुळेही तरुणी गावापेक्षा शहराकडे आकर्षित होत आहेत. 
 
शहरातील नवरा पाहिजे, ही समस्या नजीकच्या काही वर्षांपासून आहे. आता ही मागणी वाढली आहे. गावी राहणारे आणि सक्षम असलेल्या वरांनाही लग्न जुळवताना अडचणी येत आहेत. 
- दत्ताराम यादव, पालक 

शहरातील नवरा पाहिजे, अशी अपेक्षा ठेवण्यात गैर काही नाही. गावात सुविधांचा अभाव आहे. भविष्याचा विचार करून तरुणी असा निर्णय घेत असाव्यात. 
- श्‍वेता मोंडे, तरुणी 

शहराचे तरुणींना आकर्षण आहे. ग्रामीण भागात गेल्या काही वर्षांत ही समस्या अधिक आहे. त्यामुळे वर पित्यांना वधू संशोधन करण्यास खूप अडचणी येत आहेत. 
- रामदास जाधव, सामाजिक कार्यकर्ते 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 70 per cent of the young women are demanding a husband in the city.