धक्कादायक! बाळकुम रुग्णालयातून 72 वर्षीय कोरोनाग्रस्त रुग्ण बेपत्ता; रुग्णालय प्रशासनाचा भोंगळ कारभार..

corona
corona

मुंबई: ठाण्यातील बाळकुम रुग्णालयातून कोरोनाबाधित ज्येष्ठ व्यक्ती हरवल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यांच्या सूनेने रुग्णालयात फोन केल्यावर हा प्रकार उघडकीस आला. बाळकुम रुग्णालयातील सुरक्षा यंत्रणा चोख असतानाही रुग्णालयातील रुग्ण बेपत्ता होतो कसा? रुग्णालय प्रशासनही माहिती दडवून नंतर रुग्ण बेपत्ता असल्याचे सांगतात. मग रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णांची जबाबदारी नेमकी कोणाची असा सवाल नातेवाईक उपस्थित करत आहेत.
 
कळवा येथील गोदावरी अपार्टमेंटमध्ये राहणारे भालचंद्र गायकवाड (वय 72) यांचे हिमोग्लोबीन कमी झाल्याने त्यांना त्रास होत होता. भालचंद्र यांच्या नातेवाईकांनी त्यांना उपचारासाठी कळवा येथील शिवाजी रुग्णालयात दाखल केले. तेथे त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांना बाळकूम कोवीड रुग्णालयात 29 जूनला हलविण्यात आले. भालचंद्र यांच्या परिवारातील इतर सदस्यांना क्वारंटाईन करण्यात आल्याचे त्यांची सून रेणूका यांनी सांगितले. 

त्या म्हणाल्या, आम्हाला क्वारंटाईन केल्यामुळे आम्ही फोनवरच रुग्णालयात संपर्क साधून बाबांची चौकशी करत होतो. त्यावेळी तुमचे बाबा सुखरुप असल्याचे आम्हाला सांगितले जात होते. 2 तारखेपर्यंत आम्हाला आमचे बाबा सुखरुप असल्याचे कळविले होते, तसेच आम्हाला बेड नंबरही सांगण्यात येत होता. परंतू 5 जुलैला मी माझ्या ओळखीच्या एका डॉक्टरांशी संपर्क साधून बाबांची चौकशी करण्यास सांगितले असता त्या बेडवर तुमचा रुग्ण नसल्याची माहिती आम्हाला मिळाली.
 
आम्हाला अशी माहिती मिळताच आम्ही रुग्णालयाच्या प्रशासनाशी वारंवार संपर्क साधल्यानंतर आम्हाला गेल्या चार दिवसांपासून रुग्ण रुग्णालयात सापडत नसल्याचे सांगण्यात आले. तसेच तुम्ही येऊन एकदा पहाणी करावी असेही सांगण्यात आले. त्यानुसार भाऊजी आणि एक मित्र यांनी रुग्णालयात जाऊन पीपीई किट घाऊन सायंकाळी 7 ते 12 वाजेपर्यंत रुग्णालयातील प्रत्येक बेड, स्वच्छतागृह, लिफ्ट सगळ्या ठिकाणी पहाणी केली परंतू बाबा कोठेही आढळून आलेले नाहीत. 

6 जुलैला सकाळी 10 वाजता पु्न्हा एकदा रुग्णालय प्रशासनाशी संपर्क साधला परंतू त्यांच्याकडून केवळ रुग्ण बेपत्ता असल्याचे व उडवा उडवीची उत्तरे दिली जात होती. अखेर आम्ही ठाणे मतदाता जागरण अभियानाच्या डॉ. चेतना दिक्षित यांच्याशी संपर्क साधला. संघटनेचे पदाधिकारी आल्यावर रुग्णालयाचे डिन प्रो. शर्मा यांनी कापूरबावडी पोलिस ठाण्यात याविषयी तोंडी तक्रार दिल्याचे सांगितले. परंतू आम्हाला कापूरबावडी पोलिस ठाण्यात अशी कोणतीही तक्रार नोंदविली गेली नसल्याचे सांगण्यात आले.

हेही वाचा: मुंबई आता 'युनिव्हर्सल टेस्टिंग पॉलिसी'; कमी वेळात होणार कोरोनाच्या अधिक चाचण्या.. 
 
रुग्णाला रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांची संपूर्ण जबाबदारी रुग्णालय प्रशासनाची असते. माझे सासरे यांना पॅरालिसीसचा त्रास असल्याने ते स्वतः जास्त अंतर चालून कोठे जाऊ शकत नाहीत. गेले सात दिवस रुग्णालय प्रशासनाने याविषयीची माहिती का दडवून ठेवली. प्रशासनाने रुग्णाचा शोध घेऊन नातेवाईकांनाही त्याविषयी त्वरीत माहिती द्यावी अशी आमची मागणी असल्याचे रेणूका यांनी सांगितले. याप्रकरणी कापूरबावडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचेही काम सुरु असल्याचे त्या म्हणाल्या.

72 year old corona patient missing from thane hospital 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com