Powerat80 : डॉक्टरांनी सांगितलं होतं, "तुमच्याकडे केवळ ६ महिने शिल्लक आहेत"; यावर शरद पवार म्हणाले होते...

सुमित बागुल
Saturday, 12 December 2020

२००४ लोकसभा निवडणुकांच्या दरम्यान आपल्याला कॅन्सर झाल्याचं शरद पवार यांना समजलं होतं

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा आज ८०वा जन्मदिवस. आज वयाच्या ८० व्या वर्षी देखील शरद पवार यांची ग्राउंड झिरोवर उतरून काम करण्याची जिद्द आणि तळमळ तसूभरही कमी झालेली नाही. विविध उदाहरणावरून हे स्वतः शरद पवार यांनी सिद्ध करून दाखवलं आहे.

माजी केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्राचे सर्वात कमी वयात शपथ घेणारे मुख्यमंत्री म्हणूनही शरद पवार यांची ओळख. मधल्या काळात शरद पवार यांनी कॅन्सरला एका फायटर प्रमाणे मात दिली. त्यानंतर शरद पवार यांची आजही राजकारणावरील आपली पकड तशीच मजबूत आहे, हे त्यांनी दाखवून दिलं आहे.

शरद पवार यांच्याबाबत जेवढं वाचू, जेवढं बोलू तेवढं कमीच पडेल. आयुष्याच्या एका वळणावर शरद पवार यांना डॉक्टरांनी सांगितलं होतं की,  "तुमच्याकडे केवळ सहा महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे, त्यामुळे तुम्ही सर्व महत्त्वाची कामे करून घ्या".

यावर शरद पवारांनी एका कार्यक्रमात उलगडा केला होता...

एका कार्यक्रमात शरद पवार यांनी याबाबतचा किस्सा उलगडून सांगितला होता. २००४ लोकसभा निवडणुकांच्या दरम्यान आपल्याला कॅन्सर झाल्याचं शरद पवार यांना समजलं होतं. इलाजासाठी शरद पवार न्यूयॉर्कला गेले होते. तेव्हा तिथल्या काही डॉक्टरांनी त्यांना भारतातील काही तज्ज्ञांकडे जाण्याचा सल्ला दिला होता. कृषी मंत्री असताना शरद पवार यांना तब्बल ३६ वेळा रेडिएशन ट्रीटमेंट घ्यायची होती आणि हे खूपच त्रासदायक देखील होतं.

सकाळी नऊ  ते दुपारी दोन वाजेपर्यंत शरद पवार हे मिनिस्ट्रीत काम करत असत. त्यानंतर दुपारी अडीच वाजता ते अपोलो हॉस्पिटलमध्ये किमोथेरेपी घ्यायचे. किमोथेरेपीनंतर खूपच त्रास होत असल्याने घरी जाऊन आराम केल्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नसायचा. याचदरम्यान एका डॉक्टरांनी शरद पवार यांना महत्वाची कामे करून घेण्याचा सल्ला दिला होता.  तुम्ही केवळ सहा महिने जगू शकाल असं देखील त्यांनी सांगितलं होतं.

यावर शरद पवार यांनी डॉक्टरांना त्यांच्या फायटर स्पिरिटमध्ये उत्तर दिलं होतं. शरद पवार यांनी डॉक्टरांना त्यावेळी म्हटलं होतं की, "मी माझ्या आजाराची चिंता करत नाही, तुम्ही देखील करू नका". यानंतर शरद पवार यांनी कॅन्सरपासून वाचायचं असेल तर तर तंबाखूचे सेवन तात्काळ बंद करण्याचा सल्ला दिला होता. 

birthday of sharad pawar unknown facts about sharad pawar and his cancer

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 80th birthday of sharad pawar unknown facts about sharad pawar and his cancer