ग्रामीण भागात 9 लाख घरकुले उभारण्याचा निर्धार; ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची घोषणा

तुषार सोनवणे
Saturday, 21 November 2020

राज्यात सध्या अपूर्ण असलेली घरकुले तसेच अद्याप मान्यता न दिलेल्या घरकुल प्रस्तावांना मान्यता देऊन या 100 दिवसात 8 लाख 82 हजार 135 घरकुले पूर्ण करण्याचा निर्धार करण्यात आला आहे,

मुंबई : ग्रामीण भागातील नागरिकांना हक्काचा निवारा देणाऱ्या विविध योजना गतिमान करून घरकुलांच्या गुणवत्ता वाढीसाठी राज्यात 20 नोव्हेंबर 2020 ते 28 फेब्रुवारी 2021 या कालावधीत महाआवास अभियान-ग्रामीण राबविले जाणार आहे. राज्यात सध्या अपूर्ण असलेली घरकुले तसेच अद्याप मान्यता न दिलेल्या घरकुल प्रस्तावांना मान्यता देऊन या 100 दिवसात 8 लाख 82 हजार 135 घरकुले पूर्ण करण्याचा निर्धार करण्यात आला आहे, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. राष्ट्रीय आवास दिनानिमित्त मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते मुश्रीफ बोलत होते. 

हेही वाचा - फेरपरीक्षेसाठी विद्यार्थ्यांना लोकल प्रवासाची मुभा द्या; मनसेची राज्य सरकारकडे मागणी

राज्यात केंद्र व राज्य पुरस्कृत विविध योजना राबविण्यात येत आहेत. यामध्ये केंद्र व राज्य पुरस्कृत ग्रामीण योजनांतर्गत राज्यास एकूण 16 लाख 25 हजार 615 इतके घरकुलांचे उद्दिष्ट प्राप्त झाले असून, त्यापैकी 11 लाख 21 हजार 729 घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे. या 100 दिवसांच्या अभियान कालावधीत उर्वरित 5 लाख 3 हजार 886 घरकुलांना मंजुरी देण्याचा मानस आहे. तसेच या लाभार्थ्यांना प्रथम हप्ता रक्कम 15 हजार रुपयेप्रमाणे 750 कोटी रुपये वितरित करण्यात येणार आहेत, असेही मुश्रीफ यांनी यावेळी सांगितले. 

 

घरकुल लाभार्थ्यांना घरासोबतच शासनाच्या विविध योजनांशी कृतीसंगम करून अभियान कालावधीत विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने मनरेगाच्या माध्यमातून 90/95 दिवसांचा रोजगार, स्वच्छ भारत अभियानांतर्गत शौचालय बांधकामासाठी 12 हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान, प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत मोफत गॅस जोडणी, जल जीवन अभियानांतर्गत घरकुलासाठी नळाद्वारे पाणीपुरवठा, सौभाग्य योजनेतून घरकुलासाठी मोफत वीज जोडणी या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. 

 

33 हजार गवंड्यांना प्रशिक्षण 
गवंडी प्रशिक्षणांतर्गत ग्रामीण भागात कामे वेळेवर व दर्जेदार होण्यासाठी 33 हजार गवंड्यांना संस्थामार्फत प्रशिक्षण व साहित्य संच उपलब्ध करून देण्यात येणार आहे. प्रत्येक पंचायत समितीच्या आवारामध्ये 1 डेमो हाऊसची निर्मिती करणार 
घरकुल लाभार्थ्यांना स्थानिक परिस्थितीनुसार घराच्या रचनेबाबत मार्गदर्शन मिळावे. याकरिता प्रत्येक पंचायत समितीच्या आवारामध्ये एका डेमो हाऊसची उभारणी करण्यात येणार आहे. 

हेही वाचा - लव्ह जिहादच्या मुद्द्यावरून शिवसेना कोंडीत? महाविकास आघाडीवर भाजपची टीका

भूमिहीन लाभार्थ्यांना जागा देणार 
घरकुल बांधकामासाठी स्वत:ची जागा नसलेल्या राज्यातील सुमारे 73 हजार लाभार्थ्यांची जागेची अडचण दूर करण्यासाठी अभियान कालावधीत विविध उपाययोजना करण्यात येणार आहेत. पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी योजनेंतर्गत जागा खरेदीसाठी 50 हजारापर्यंत अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. शासकीय जमीन विनामूल्य उपलब्ध करून देणे, ग्रामीण भागातील निवासी प्रयोजनासाठीची अतिक्रमणे नियमानुकूल करणे या उपाययोजना करण्यात येणार आहेत. 

 

बॅंकेमार्फत 70 हजारांचे कर्ज 
अभियान कालावधीत इच्छुक लाभार्थ्यांना दर्जेदार घरकुल बांधकाम करता यावे व सर्व मूलभूत सुविधांचा लाभ घेता यावा याकरिता अनुदानाव्यतिरिक्त बॅंकेमार्फत 70 हजार रुपये कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी राज्य, जिल्हा व तालुका पातळीवर प्रयत्न करण्यात येणार आहेत. 
9 lakh in rural areas Determination to build houses Announcement by Rural Development Minister Hasan Mushrif 

----------------------------------------------------------'

( संपादन - तुषार सोनवणे ) 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 9 lakh in rural areas Determination to build houses Announcement by Rural Development Minister Hasan Mushrif

टॉपिकस