ये बात...! 90 वर्षांच्या आजीबाईंची कोरोनावर मात, वाचा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 मे 2020

भिवंडीतील 90 वर्षीय आजीबाईंना त्यांच्या मुलांमुळे कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यांना त्यांच्या दोन मुलांसह ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात 22 एप्रिलला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

ठाणे : गेल्या दोन दिवसांपूर्वी सहा महिन्यांच्या चिमुरड्याने कोरोनावर मात केल्यानंतर मंगळवारी (ता.5) भिवंडीतील 90 वर्षीय आजीबाईंनीही कोरोनाशी दोन हात करत घरवापसी केली आहे. कोरोनावर मात करणाऱ्या त्या ठाणे जिल्ह्यातील पहिल्या वयोवृद्ध आजीबाई ठरल्या आहेत. त्यांच्याबरोबर बदलापूरातील १० जणांच्या दोन कुटुंबांनी आणि वसई आणि ठाणे महापालिका क्षेत्रातील प्रत्येकी दोन अशा 16 जणांनी कोरोनावर विजय मिळवत स्वगृही प्रस्थान केले. या सर्वांना ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी टाळ्या वाजवून रुग्णालयातून निरोप दिला.

मोठी बातमी : लवकरच येऊ शकते गोड बातमी ! १०० युनिटपर्यंत वीज मोफत? मंत्री नितीन राऊत यांचं मोठं वक्तव्य..

ठाणे जिल्हा रुग्णालयात गेल्या एक ते दीड महिन्यांपासून ठाणे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलाश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोनाबाधित रुग्णांवर डॉ. नेताजी मुळीक, डॉ. श्रीजित शिंदे, डॉ. प्रसाद भंडारी यांच्यासह डॉक्टरांचे पथक उपचार करत आहे. त्यात गेल्या तीन दिवसांपूर्वी जिल्हा सामान्य रुग्णालयातून 9 जण कोरोनावर मात करत घरी परतले. यामध्ये सहा महिन्यांच्या चिमुरड्याचा समावेश असून कोरोनाला हरवून मंगळवारी 16 जण सुखरूप घरी परतले आहेत. यामध्ये बदलापूर येथील दोन कुटुंबातील दहा जणांचा समावेश आहे. यात 10 वर्षाखालील मुलेही आहेत. त्यातच एका कुटुंबातील सहा महिन्यांची तान्हुली निगेटिव्ह असतानादेखील उपचारार्थ दाखल झालेल्या आईसोबत रुग्णालयात आली होती. मात्र, ती शेवटपर्यंत निगेटिव्ह राहिली. कोरोनाच्या तीन टेस्ट केल्यानंतर तिचे अहवाल निगेटिव्हच आले. त्याचबरोबर वसई, विरारमधील दोघे, ठाणे पालिकेतील कर्मचारी आणि भिवंडीतील तिघांनाही घरी सोडण्यात आले. यामध्ये 90 वर्षीय आजीबाईंनी कोरोनावर मात केल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.

हे ही वाचा : 'का' वाढतोय कोरोना रुग्णांचा आकडा? मुंबई पालिकेनं घेतला शोध... 

आजीबाईंची मुले रुग्णालयातच
भिवंडीतील 90 वर्षीय आजीबाईंना त्यांच्या मुलांमुळे कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यांना त्यांच्या दोन मुलांसह ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात 22 एप्रिलला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मंगळवारी आजीबाईंची टेस्ट निगेटिव्ह आली. त्यामुळे आजीबाईंना घरी सोडण्यात आले. त्यांच्या मुलांची टेस्ट अद्यापही निगेटिव्ह न आल्याने त्यांना सोडण्यात आले नाही. आजीबाईंनी रुग्णालयात करण्यात आलेल्या उपचाराबाबत समाधान व्यक्त केले.

90-year-old grandmother Corona report negative


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 90-year-old grandmother Corona report negative