Mahavitran strike : महावितरणचे कल्याण परिमंडळातील 92 टक्के कर्मचारी संपात सहभागी

खासगीकरण विरोधात कर्मचाऱ्यांचा राज्यव्यापसंप
Mahavitran strike
Mahavitran strikesakal

डोंबिवली - महावितरणच्या खासगीकरणला विरोध करत राज्यभरातील महावितरण कर्मचाऱ्यांकडून तीन दिवसांचा संप पुकारण्यात आला आहे. कल्याण परिमंडळातील सुमारे 2 हजार 757 कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत. महावितरणच्या तेजश्री येथील कार्यालय आवारात एकत्र जमत कर्मचाऱ्यांनी खासगीकरण विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

महावितरण कंपनीच्या खाजगीकरणा विरोधात महावितरण कर्मचाऱ्यांनी संपाची हाक पुकारली आहे. मंगळवारी मध्यरात्रीपासून हा संप सुरू झाला असून, यामध्ये राज्य भरातील 31 संघटना सहभागी घेतला आहे.

महावितरण च्या कल्याण परिमंडळ क्षेत्रात सुमारे 3 हजार कर्मचारी काम करतात, त्यातील सुमारे 2 हजार 757 कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत. राज्य वीज कर्मचारी, अधिकारी, अभियंता संघर्ष समितीचे सदस्य अविनाश शेवाळे म्हणाले,

अदानी इलेक्ट्रिक कंपनीने राज्यात महसुली दृष्ट्या अतिशय महत्त्वाचा असा ठाणे, नवी मुंबई, उरण, पनवेल, तळोजा विभागासाठी महाराष्ट्र राज्य नियामक आयोगाकडे समांतर परवानगीसाठी अर्ज केलेला आहे.

हा परवाना देण्यात आला तर राज्याच्या वीज उद्योगावर त्याचे विपरीत परिणाम होतील. आम्ही पगार वाढ किंवा इतर आमच्या खासगी मागण्यांसाठी नाही तर महावितरणचे खासगीकरण होऊ नये यासाठी लढा देत आहोत.

गेले दिड वर्ष विविध आंदोलनाच्या माध्यमातून हा लढा सुरू असल्याचे सांगितले. ऊर्जा मंत्र्यांसोबत कृती समितीची बैठक असून या बैठकीत योग्य तोडगा निघेल अशी अपेक्षा देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली.

संपाच्या पार्श्वभूमीवर नियंत्रण कक्ष कार्यरत

महावितरणमधील कर्मचारी, अधिकारी व अभियंत्यांच्या विविध संघटना बुधवारी मध्यरात्रीपासून संपावर गेल्या आहेत. या संपाच्या पार्श्वभूमीवर कल्याण परिमंडलातील ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक तयारी मुख्य अभियंत्यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली आहे.

मुख्य कार्यालयाच्या निर्देशानुसार परिमंडलातील कल्याण एक आणि दोन, वसई व पालघर या चारही मंडल कार्यालयात संप काळासाठी नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. संपाच्या कालावधीत वीजपुरवठा बाधित होणे, अपघात, वीज यंत्रणेचे नुकसान अथवा अपघात यासंदर्भात आपापल्या कार्यक्षेत्रातील नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून माहिती देण्याचे व सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे.

कर्मचारी, अधिकारी, अभियंते तसेच कंत्राटी कामगार या संपात सहभागी होत आहेत. त्यामुळे या संपात नसणारे कर्मचारी, अभियंते, अधिकारी याशिवाय देखभाल-दुरुस्तीसाठीच्या एजन्सीसह इतर कंत्राटदारांचे कामगार, सेवानिवृत्त कर्मचारी व प्रशिक्षणार्थी यांच्या मदतीने संप काळात वीजपुरवठा अबाधित ठेवण्यासाठी नियोजन करण्यात आलेले आहे.

कल्याण पश्चिम आणि पूर्व, डोंबिवली या विभागाचा समावेश असलेल्या कल्याण मंडल कार्यालय एकसाठी नियंत्रण कक्षाचे 8879626138 आणि 8879626139 हे मोबाईल क्रमांक आहेत. तर उल्हासनगर, बदलापूर, अंबरनाथ, टिटवाळा, मुरबाड, शहापूर आदी भागांचा समावेश असलेल्या कल्याण मंडल कार्यालय दोनसाठी नियंत्रण कक्षाचे 8879626969 आणि 9004696511 हे मोबाईल क्रमांक आहेत.

वसई, विरार, नालासोपारा, आचोळे, वाडा भागाचा समावेश असलेल्या वसई मंडल कार्यालयाच्या नियंत्रण कक्षाचे 7875760601 आणि 7875760602 हे मोबाईल क्रमांक आहेत. तर पालघर, बोईसर, डहाणू, तलासरी, जव्हार, मोखाडा व विक्रमगडचा समावेश असलेल्या पालघर मंडल कार्यालयाच्या नियंत्रण कक्षाचे 9028005994 आणि 9028154278 हे संपर्क क्रमांक असून त्यावर ग्राहकांनी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

नियंत्रण कक्षाचे संपर्क क्रमांक संप कालावधीत चोवीस तास सुरू राहणार आहेत. वीजेसंदर्भातील तक्रारी व माहिती देण्यासाठी आपापल्या कार्यक्षेत्रातील नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com