बेकायदा बांधकामाबाबत मुंबईत 94 हजार तक्रारी; केवळ 5 हजार प्रकरणांत कारवाई

बेकायदा बांधकामाबाबत मुंबईत 94 हजार तक्रारी;  केवळ 5 हजार प्रकरणांत कारवाई



मुंबई: कंगना राणौतच्या पालीहिल येथील बंगल्यावर झालेल्या कारवाईनंतर मुंबईतील अनाधिकृत बांधकामाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला. कंगना समर्थकांकडून मुंबईतील झोपड्यांचे छायाचित्र व्हायरल केले जात असून यांच्यावर कधी कारवाई करणार, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. पालिकेच्या आकडेवारीनूसार, मुंबईत बेकायदा बांधकामाबाबत तब्बल 94 हजार 851 तक्रार आल्या होत्या. त्यातील 12 हजार 157 तक्रारींचा पालिकेने निपटारा केला असून 5 हजार 461 बांधकामांवर कारवाई केली आहे.

महापालिकेने अनधिकृत बांधकामांच्या तक्रारींसाठी ऑनलाईन यंत्रणा उभारली आहे. त्यावर 2016 ते 8 जुलै 2019 पर्यंत 94 हजार 851 तक्रारी आल्या होत्या. त्यातील 5 हजार 461 बेकायदा बांधकामावर कारवाई करण्यात आली.  94 हजार तक्रारींपैकी 42 हजार 697 तक्रारी दुसऱ्यांदा करण्यात आला, असा दावा महापालिकेने केला होता. माहिती अधिकार कार्यकर्ते शकिल अहमद यांनी माहितीच्या अधिकाराअंतर्गत ही माहिती मिळवली होती. मुंबईत एखादी दुर्घटना घडल्यानंतरच बेकायदा बांधकामावर कारवाई केली जाते, असा दावाही त्यांनी केला आहे.
मुंबई महापालिका दरवर्षी 15 ते 16 हजार बेकायदा बांधकामांना नोटीस देते. त्यातील फक्त 15 ते 20 टक्के बांधकामावर कारवाई होते. मुंबईतील सर्वाधिक बांधकामाच्या तक्रारी कुर्ला एल प्रभागाच्या हद्दीतून येतात. या प्रभागात 9 हजार 192 तक्रारींची नोंद असून त्यातील 323 बांधकामांवर कारवाई करण्यात आली आहे. त्या खालोखाल पी उत्तर मालाड भागात 8 हजार 588 तक्रारी नोंद असून त्यातील 705 बांधकामावर कारवाई करण्यात आली. तर,अंधेरी पुर्व के पुर्व प्रभागात 8 हजार 104 बांधकामांची तक्रारी होती. त्यातील 493 ठिकाणी कारवाई करण्यात आली. सर्वात कमी तक्रारी सी प्रभाग मरिनलाईन्स गिरगाव परीसरातील आहेत. येथे 1037 तक्रारींची नोंद आहे.

बेकायदा बांधकाम दुर्घटना
बेकायदा बांधकाम किंवा बदलांमुळे घडलेली कमाल मिल दुर्घटना ही मुंबईतील सर्वात मोठी दुर्घटना आहे. यात 14 जणांचा मृत्यू झाला होता. तर, 55 हून अधिक जखमी झाले होते. यात चटई क्षेत्र निर्देशांचे उल्लंघन, रुफ टॉप हॉटेलमध्ये बेकायदा छत तसेच हुक्का पिण्यास परवानगी असे प्रकार होते. त्यापुर्वी जुलै 2018 मध्ये घाटकोपर येथे साई सिध्दी इमारत कोसळून 17 जणांचा बळी गेला होता. या इमारतीतील तळमजल्यावरील घरातील पिलर तोडण्यात आला. तसेच, हे घर शिवसेनेकडून पालिकेची निवडणुक लढलेल्या स्वाती शितप यांचे पती सुनिल शितप यांच्या मालकीचे होते.
-------------------------------------------------- 

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com