esakal | शैक्षणिक साहित्याविना भरते आश्रमशाळा!
sakal

बोलून बातमी शोधा

वाडा ः पूर ओसरल्यानंतर सुरू झालेली पाली येथील सरकारी आश्रमशाळा.

वाड्यातील पुरात नुकसान झालेली पाली येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाची सरकारी आश्रमशाळा नवीन इमारतीत सुरू करण्याच्या खासदारांच्या आदेशाला शाळा प्रशासनाने केराची टोपली दाखवली आहे.

शैक्षणिक साहित्याविना भरते आश्रमशाळा!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वाडा (बातमीदार) : वाड्यातील पुरात नुकसान झालेली पाली येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाची सरकारी आश्रमशाळा नवीन इमारतीत सुरू करण्याच्या खासदारांच्या आदेशाला शाळा प्रशासनाने केराची टोपली दाखवली आहे. तसेच प्रशासनाने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची पूर्तता न करता शाळा सुरू केल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती पालकांनी व्यक्त केली आहे.

वाडा तालुक्‍यात ४ ऑगस्टला झालेल्या महाप्रलयात पिंजाळ नदीने धोक्‍याची पातळी ओलांडल्याने नदीकाठी पाली येथे असलेल्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या शासकीय आश्रमशाळेत पिंजाळ नदीचे पाणी शिरले. येथील तब्बल ४५० विद्यार्थ्यांचे कपड्यासह शैक्षणिक साहित्य वाहून गेल्याने या शाळेचे मोठे नुकसान झाले होते. शाळा स्वच्छ करण्यासाठी विद्यार्थ्यांना १० दिवसांची सुट्टी देण्यात आली होती. याचदरम्यान खासदार राजेंद्र गावित यांनी या आश्रमशाळेची पाहणी करून ही शाळा नवीन इमारतीत सुरू करण्याचे आदेश दिले होते; मात्र त्याकडे दुर्लक्ष करत आश्रमशाळा प्रशासनाने ही शाळा जुन्याच इमारतीत सुरू केली आहे.

पाली आश्रमशाळेत पहिली ते बारावीपर्यंत ६३० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यापैकी ४३० विद्यार्थी निवासी आहेत. एकात्मिक विकास प्रकल्पाने तत्काळ या विद्यार्थ्यांना दप्तरे, वह्या, पुस्तके शालोपयोगी वस्तू द्याव्यात, अशी मागणी पालकांनी केली होती; परंतु राजकीय व सामाजिक संघटनांनी केलेल्या मदतीव्यतिरिक्त आश्रमशाळा प्रशासनाने कुठल्याही प्रकारची मदत केली नसल्याचे पालकांचे म्हणणे आहे.
 

विद्यार्थ्यांना लागणाऱ्या शैक्षणिक साहित्याची उपलब्धता करून शाळा सुरू करण्यात आली आहे.
- अनिल सोनवणे, सहायक प्रकल्प अधिकारी, जव्हार

आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची उपलब्धता झाली आहे; मात्र थोड्याफार प्रमाणात कमतरता आहे.
- बाळाजी गवादे, अधीक्षक, पाली आश्रमशाळा

अनेक विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य मिळाले नसल्याची तक्रार विद्यार्थी आणि पालकांनी आमच्याकडे केली आहे. 
- देवेंद्र भानुशाली, मनसे कार्यकर्ते 

loading image
go to top