नवी मुंबईत सुमारे पाच हजार खड्डे!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 सप्टेंबर 2019

मुसळधार पावसामुळे नवी मुंबई शहरातील रस्त्यांवर यंदाच्या वर्षी तब्बल पाच हजार खड्डे आहेत. अभियांत्रिकी विभागाच्या कामाकरिता तयार केलेल्या ‘दक्ष’ या ऑनलाईन प्रणालीत या खड्ड्यांची नोंद झाली आहे.

नवी मुंबई : मुसळधार पावसामुळे नवी मुंबई शहरातील रस्त्यांवर यंदाच्या वर्षी तब्बल पाच हजार खड्डे आहेत. अभियांत्रिकी विभागाच्या कामाकरिता तयार केलेल्या ‘दक्ष’ या ऑनलाईन प्रणालीत या खड्ड्यांची नोंद झाली आहे. हे खड्डे बुजवण्यासाठी अभियांत्रिकी विभागामार्फत युद्धपातळीवर दुरुस्तीची कामे सुरू आहेत. या खड्ड्यांपैकी अभियांत्रिकी विभागाकडून आत्तापर्यंत सुमारे ३ हजार ५०० खड्डे बुजवण्यात आले आहेत.   
 
शहरातील बहुतांश रस्ते खड्डेमय झाल्यामुळे नागरिकांना रस्त्यांवरून चालणे व वाहनचालकांना वाहन चालवणेदेखील जिकिरीचे झाले आहे. रस्त्यांवर पडलेल्या या खड्ड्यांवरून गेल्या दोन स्थायी समितीच्या बैठकांमध्ये तीव्र पडसाद उमटले. लोकप्रतिनिधींनी खड्ड्यांमुळे प्रशासनाला अक्षरशः धारेवर धरले. महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ हेदेखील आक्रमक झाल्यामुळे सध्या अभियांत्रिकी विभागातील वातावरण गरम झाले आहे. मिसाळ यांनी सर्व खड्डे तत्काळ बुजवण्याचे आदेश संबंधितांना दिले आहेत. तसेच दक्ष प्रणालीत या कामांच्या नोंदी करण्याच्या सूचना मिसाळ यांनी दिल्या होत्या. मिसाळ यांच्या सूचनेनंतर ऐरोली, घणसोली, कोपरखैरणे, तुर्भे, ठाणे-बेलापूर रस्ता, वाशी, नेरूळ, सानपाडा, बेलापूर आदी भागातील पडलेले खड्ड्यांचे छायाचित्र काढून प्रणालीवर अपलोड करून खड्डे बुजवल्यानंतर पुन्हा त्याचे छायाचित्र काढून अपलोड करण्याचे काम वेगाने सुरू आहे. या कामांमुळे शहरात दिघा ते बेलापूरपर्यंतच्या नोडमध्ये तब्बल पाच हजार खड्डे पडल्याची नोंद झाल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. परंतु ज्या वेगाने खड्डे बुजवण्याचे काम कंत्राटदारांकडून सुरू आहे, त्यानुसार शहरातील साडेतीन हजार खड्डे बुजवण्यात प्रशासनाला यश आले आहे. परंतु गेले तीन दिवस पावसाच्या सतत सुरू असलेल्या रिपरिपीमुळे खड्डे बुजवण्याच्या कामात अडथळा निर्माण होत आहे. 

दोन कार्यकारी अभियंत्यांना नोटिसा
रस्त्यावर पडलेले खड्डे तत्काळ बुजवण्याच्या सूचना वारंवार देऊनही त्यावर कार्यवाही न केल्याबद्दल दोन कार्यकारी अभियंत्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीसही बजावण्यात आली आहे. आपल्याला निलंबित का करू नये, असे अभियंत्यांना बजावण्यात आले आहे. त्यामुळे अभियांत्रिकी विभागातील अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

शहरात पडलेल्या खड्ड्यांपैकी तब्बल साडेतीन हजार खड्डे बुजवण्यात आले आहेत. उर्वरित एक हजार २५० खड्डे बुजवण्याचे काम सुरू आहे. खड्डेमय रस्ते राहणार नाहीत, अशी काळजी घेण्याच्या सूचना अभियांत्रिकी विभागाला दिल्या आहेत. 
- अण्णासाहेब मिसाळ, आयुक्त.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: About five thousand pits in Navi Mumbai!