खालापूर जंगलातील पत्नीची हत्या, चारित्र्याच्या संशयावरून; मृतदेह टाकणाऱ्या पतीसह त्याच्या मित्राला अटक; रबाळे पोलिसांची कारवाई

मनोज कळमकर
Friday, 31 July 2020

खालापुरातील जंगलात प्लास्टिकच्या पिंपात आढळलेला महिलेचा मृतदेह हा चारित्र्याच्या संशयावरून हत्या केल्याचे उघड झाले आहे

 

नवी मुंबई : खालापुरातील जंगलात प्लास्टिकच्या पिंपात आढळलेला महिलेचा मृतदेह हा चारित्र्याच्या संशयावरून हत्या केल्याचे उघड झाले आहे याप्रकरणी महिलेच्या पतीसह त्याला मदत करणाऱ्या त्याच्या साथीदाराला रबाळे पोलिसांनी अटक केली आहे.  चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची गळा आवळून हत्या केल्याचे पतीने कबूल केले आहे.

राज्यात पुन्हा उद्रेक.... एकाच दिवसात 11,147 रुग्णांची भर; वाचा इतर आकडेवारी

अंबुज तिवारी (28) आणि श्रीकांत चौबे (30) अशी आरोपींची नावे आहेत. घणसोलीत राहणारा आरोपी पती अंबुज व त्याची पत्नी नीलम या दोघांचा विवाह 2016 मध्ये झाला. त्यांना एक मुलगाही आहे. मात्र, अंबुजला नीलमच्या चारित्र्यावर संशय असल्याने त्यांच्यात नेहमी भांडण व्हायचे. त्यामुळे दोन वर्षांपूर्वी नीलम पतीपासून वेगळी होऊन ठाणे येथे आपल्या माहेरी गेली होती. मात्र, तरी ती अधूनमधून अंबुजला भेटण्यासाठी घणसोली येथे येत होती. 22 जुलैलाही ती अंबुजला भेटण्यासाठी घणसोली येथे आली होती. त्या वेळी दोघेही घणसोलीतील अर्जुनवाडी येथे राहणारा मित्र श्रीकांत चौबे याच्या फ्लॅटवर गेले. दोघेही एक दिवस थांबणार असल्याने श्रीकांत फ्लॅटमधून बाहेर निघून गेला. दुसऱ्या दिवशी पुन्हा या दोघांमध्ये चारित्र्याच्या संशयावरून वाद झाला. यात अंबुजने नीलमचा ओढणीच्या साह्याने गळा आवळून हत्या केली. श्रीकांत फ्लॅटवर आल्यानंतर अंबुजने हत्या केल्याचे त्याला समजले. त्यानंतर या दोघांनी पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने नीलमचा मृतदेह प्लास्टिकच्या पिंपात लपवून ठेवला. त्यानंतर त्याचदिवशी त्यांनी टेम्पोमधून तो मृतदेह खालापूर येथील जंगलात टाकला. तेथून तो फरार झाला होता.

महापौरांनी केली नायर रुग्णालयाची पाहणी; कोरोनाबाधितांशीही साधला संवाद...

नीलमच्या वडिलांनी रबाळे पोलिस ठाण्यात अंबुज व त्याची पत्नी दोघे बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या अनुषंगाने रबाळे पोलिसांनी या दोघांचा शोध सुरू केला. उत्तर प्रदेशाला पळून गेलेला अंबुज 28 जुलैला घणसोलीत परतल्यावर रबाळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पोलिसांनी संशयावरून त्याची उलट तपासणी केली. त्या वेळी त्याने पत्नीची हत्या करून तिचा मृतदेह मुंबई-पुणे महामार्गालगत टाकून दिल्याची कबुली दिली. याप्रकरणी अंबुजला मदत करणारा त्याचा मित्र श्रीकांतलाही अटक केल्याची माहिती परिमंडळ-1चे पोलिस उपआयुक्त पंकज डहाणे यांनी दिली.  

---------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: abused with wife in Khalapur forest, on suspicion of character; Her friend arrested along with her husband who dumped the body; Rabale police action