"एसीबी'च्या कारवायांमध्ये राज्यात 28 टक्‍क्‍यांची घट! लॉकडाऊनमुळे कारवाईचे प्रमाण घसरले

अनिश पाटील
Saturday, 28 November 2020

यंदाच्या वर्षी राज्यभरातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) कारवायांमध्ये जवळपास 28 टक्‍क्‍यांनी घट झाली आहे.

मुंबई ः यंदाच्या वर्षी राज्यभरातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) कारवायांमध्ये जवळपास 28 टक्‍क्‍यांनी घट झाली आहे. लॉकडाऊनच्या काळात एप्रिल व मे महिन्यात तर या कारवायांमध्ये अनुक्रमे 88 टक्के आणि 61 टक्‍क्‍यांची घट झाली. या वर्षी मुंबई विभागाने सर्वात कमी म्हणजे केवळ 19 कारवायाच केल्या. 

हेही वाचा - एक्स्प्रेस हायवेवरील एसटी बस अपघात चालकाच्या चुकीमुळेच! पोलिस तपासाअंती सत्य समोर

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या वर्षी नोव्हेंबरपर्यंत 558 सापळा कारवाया केल्या असून त्यात 763 आरोपींचा समावेश होता. गेल्या वर्षी याच कालवधीत झालेल्या 773 कारवायांमध्ये 1047 आरोपींचा समावेश होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 215 कमी गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. लॉकडाऊन हे त्याचे प्रमुख कारण असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर एप्रिल महिन्यात केवळ सात सापळा गुन्ह्यांची नोंद करण्यात आली होती. 2019 मध्ये एप्रिल महिन्यामध्ये 58 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली होती. तसेच मे महिन्यातही केवळ 30 कारवाया करण्यात आल्या होत्या. गेल्या वर्षी मे महिन्यात 76 कारवाया एसीबीने केल्या होत्या. या दोन महिन्यांत लॉकडाऊनचे कडक निर्बंध असल्याने कारवाईत मोठी घट झाली.

हेही वाचा - कराची बेकरीचे मालक फाळणीतील हिंसेचे बळी; मनसेच्या नोटीशीला दिले उत्तर

विशेष म्हणजे मुंबई विभागात या वर्षी सर्वात कमी केवळ 19 सापळा गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. एप्रिल महिन्यांपासूनच मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या अधिक होती. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात एकही सापळा कारवाई झालेली नाही. एप्रिलनंतर थेट ऑक्‍टोबर महिन्यात मुंबई एसीबीने पहिली सापळा कारवाई केली. लॉकडाऊनंतर 6 ऑक्‍टोबरला मुंबई एसीबीने एकाच दिवशी दोन कारवाया करून चार आरोपींनी अटक केली होती. लॉकडाऊनंतरही यावर्षी पुणे विभागाने सर्वाधिक 128 सापळा कारवाया केल्या. त्याच्यापाठोपाठ नाशिक विभागाने 87 कारवाया केल्या. 
ACBs operations down 28% in the state Lockdown slows down operations

----------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ACBs operations down 28% in the state Lockdown slows down operations