95 हजार घरांच्या महा गृहनिर्माण योजनेला वेग

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 डिसेंबर 2019

सिडकोच्या 95 हजार घरांच्या महागृहनिर्माण योजनेंतर्गत घरांचे बांधकाम सुरू असलेल्या बांधकामस्थळांना सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी भेट दिली.

नवी मुंबई : सिडकोतर्फे नवी मुंबईत ठिकठिकाणी उभारण्यात येत असलेल्या परवडणाऱ्या 95 हजार महा गृहनिर्माण योजनेला वेग आला आहे. तळोजा नोडसह खारघर, कळंबोली, नवीन पनवेल येथील बस टर्मिनस; कळंबोली व वाशी येथील ट्रक टर्मिनस आणि सानपाडा, जुईनगर, खारघर, बामणडोंगरी, खारकोपर, मानसरोवर व खांदेश्‍वर रेल्वे स्थानकांच्या परिसरातील सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी पाहणी करत आढावा घेतला.

सिडकोच्या 95 हजार घरांच्या महागृहनिर्माण योजनेंतर्गत घरांचे बांधकाम सुरू असलेल्या नवी मुंबईतील खारघर, खारकोपर रेल्वे स्थानक, बामणडोंगरी रेल्वे स्थानक, तळोजा येथील बांधकामस्थळांना भेट दिली. या वेळी या गृहनिर्माण योजनांच्या सद्यस्थितीचा आढावा लोकेश चंद्र यांनी घेतला. तसेच हे काम वेगाने पूर्ण करण्याबाबत उपस्थित सिडको अधिकाऱ्यांना आणि नेमलेल्या संबंधित एजन्सीच्या प्रतिनिधींना सूचना केल्या.

सिडकोतर्फे परिवहन केंद्रित विकास संकल्पनेवर आधारित सिडको महा गृहनिर्माण योजना-2019 अंतर्गत नवी मुंबईतील विविध बस व ट्रक टर्मिनल्स आणि रेल्वे स्थानकांच्या फोर कोर्ट एरियामध्ये 95 हजार घरे बांधणे प्रस्तावित आहे. ही योजना प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न गटांकरिता प्रस्तावित आहेत. या गृहनिर्माण योजनेंतर्गत तळोजा नोडसह खारघर, कळंबोली, नवीन पनवेल येथील बस टर्मिनस; कळंबोली व वाशी येथील ट्रक टर्मिनस आणि सानपाडा, जुईनगर, खारघर, बामणडोंगरी, खारकोपर, मानसरोवर व खांदेश्‍वर रेल्वे स्थानकांच्या फोरकोर्ट एरियामध्ये घरे बांधण्यात येणार आहेत.

ही बातमी वाचा ः नवी मुंबइतील 'या' प्रकल्पांचे उद्धाटन लवकरच !

यापैकी पहिल्या पॅकेजअंतर्गत 20,448; दुसऱ्या पॅकेजअंतर्गत 21,564; तिसऱ्या पॅकेजअंतर्गत 21,517 व चौथ्या पॅकेजअंतर्गत 23,432 घरे बांधण्यात येणार आहेत. त्यासोबतच 7,905 सदनिकांची गृहनिर्माण योजनादेखील आकारास येत आहे. प्रत्येक पॅकेजअंतर्गत करण्यात येणाऱ्या घरांच्या बांधकामाचे काम वेगवेगळ्या कंपन्यांना सोपवण्यात आले आहे. त्यानुसार पॅकेज- 1 अंतर्गत बी. जी. शिर्के कन्स्ट्रक्‍शन्स टेक्‍नॉलॉजी प्रा. लि.; पॅकेज- 2 अंतर्गत कपॅसाइट इन्फ्राप्रोजेक्‍ट लि; पॅकेज- 3 अंतर्गत शापूरजी पालोनजी ऍण्ड कंपनी लि. व पॅकेज- 4 अंतर्गत लार्सन ऍण्ड टुब्रो या कंपन्यांकडून घरांचे बांधकाम करण्यात येणार आहे. 

हक्काच्या घराचे स्वप्न पाहणाऱ्या विविध आर्थिक स्तरांतील नागरिकांसाठी सिडको महामंडळाच्या गृहनिर्माण योजनांद्वारे सातत्याने परवडणाऱ्या दरातील घरे उपलब्ध करून देण्यात येतात. यामुळे आजवर लक्षावधींचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होण्यास मदत झाली आहे. सर्वांसाठी घरे या उद्दिष्टपूर्तीअंतर्गत ठरवून दिलेल्या घरांचे लक्ष्य सिडको लवकरच गाठेल. 
- लोकेश चंद्र, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Accelerate the grand scheme of 95 thousand houses