कारवाई सुरूच! कंगनाच्या बंगल्यामधील बेकायदा बांधकाम पाडल्यानंतर आता खार येथील घरावर हातोडा?

कारवाई सुरूच! कंगनाच्या बंगल्यामधील बेकायदा बांधकाम पाडल्यानंतर आता खार येथील घरावर हातोडा?

मुंबई : अभिनेत्री कंगना राणौतच्या पालीहिल येथील कार्यालयातील कथित बेकायदा बांधकाम आज महापालिकेने हटवले. मुंबई उच्च न्यायालयाने दुपारी या तोडकामाला स्थगिती दिली असली तरी तोपर्यंत 75 टक्के बांधकाम तोडण्यात आले होते. दुसरीकडे, कंगनाच्या खार येथील राहत्या घरातील बेकायदा बांधकामाच्या कारवाईवरील स्थगिती हटविण्यासाठी पालिकेने दिंडोशी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.

मुंबई महापालिकेच्या एच पश्‍चिम प्रभाग कार्यालयाच्या इमारत व कारखाने विभागाने मंगळवारी कंगनाच्या कार्यालयात होत असलेले बांधकाम बेकायदा ठरवून 24 तासांची नोटीस बजावली होती. 24 तासांत बांधकामासाठी घेतलेल्या परवानग्यांचे कागपत्र सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र, दिलेल्या मुदतीत हे कागदपत्र सादर न केल्याने पालिकेने आज सकाळी 10.30 वाजता ही कारवाई सुरु केली. 30 कामगार, अधिकारी जेसीबी ट्रकच्या मदतीने बांधकाम पाडण्यात आले. कारवाई सुरु असतानाच कंगनाच्या वतीने उच्च न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला. न्यायालयाने तुर्तास या कारवाईला स्थगिती दिली आहे. मात्र, दुपारी 12 वाजेपर्यंत झालेल्या कारवाईत पालिकेने ज्या बांधकामांवर आक्षेप घेतला होता त्यातील 75 टक्के बांधकाम पाडल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.

कंगनाच्या खार येथील राहत्या घरातील बेकायदा बांधकामाबाबतही पालिकेने 2018 मध्ये नोटीस पाठवली होती. या नोटीसला कंगनाच्या वतीने दिंडोशी न्यायालयात आव्हान दिले होते. सध्या या कारवाईला स्थगिती असली तरी ही स्थगिती हटविण्यासाठी पालिकेकडून न्यायालयात अर्जही करण्यात आला आहे. या घरातही चटई क्षेत्र निर्देशांचे उल्लंघन करण्यात आले आहे. तसेच इतरही अंतर्गत बदल करण्यात आले, असा पालिकेचा आक्षेप आहे.
कंगनाने 2017 मध्ये 5 कोटी रुपयांमध्ये हा बंगला विकत घेतला होता. तर, कार्यालय तयार करण्यासाठी 48 कोटी रुपये खर्च केले आहेत, अशी माहिती पुढे येत आहे. हा निवासी बंगला असल्याने त्यात पालिकेची पुर्व परवानगी न घेता कार्यालय सुरु करण्यात आले होते. तसेच, दुरुस्तीच्या नावाखाली मुळ इमारतीत बेकायदा बदल करण्यात येत होते, असा पालिकेचा आक्षेप आहे.

कंगनाने शिवसैनिकांना चुकवले
कंगना राणौतची वाट अडविण्यासाठी आज विमानतळावर शिवसैनिक जमले होते. मात्र, ती विमान तळावरुन दुसऱ्याच मार्गाने आल्याने उपस्थित शिवसैनिकांकडे घोषणा देण्याशिवाय कोणताही पर्याय उरला नव्हता. तर, केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी कंगनाला संरक्षण देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार तेथे त्यांचे कार्यकर्तेही पोहचले होते. आठवले समर्थक आणि शिवसैनिकांमध्ये विमानतळावरच घोषणाबाजी सुरू होती. 

होम क्वारंटाईनही नाही
विमानाने परराज्यातून येणाऱ्या प्रवाशांना 14 दिवस होम क्वारंटाईन करण्यात येते. तसे, शिक्केही हातावर मारले जातात. मात्र, कंगनाने होम क्वारंटाईनही चुकवले. कंगनाने मुंबईत येण्यापुर्वीच स्वत:ची चाचणी करुन घेतली. त्याच बरोबर तातडीच्या कामासाठी मुंबईत आल्याचे होम क्वारंटाईनमधून सवलत मिळवल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, याला अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही.

----------------------------------------

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com