कंगनाच्या बंगल्यावरील कारवाई सुडबुद्धीने! आशिष शेलार यांची पालिका, राज्य सरकारवर टीका

मिलिंद तांबे
Wednesday, 9 September 2020

मुंबई आणि महाराष्ट्राबाबत कोणी पाकिस्तान आणि अन्य काही उल्लेख करील तर, त्याच्याशी आम्ही बिलकुल सहमत नाही

मुंबई : मुंबई आणि महाराष्ट्राबाबत कोणी पाकिस्तान आणि अन्य काही उल्लेख करील तर, त्याच्याशी आम्ही बिलकुल सहमत नाही. मात्र, कंगना राणौतच्या बंगल्यावर पालिका आणि राज्य सरकारने सुड बुद्धीने कारवाई केली, असा आरोप भाजप नेते, आमदार अॅड आशिष शेलार यांनी केला आहे. हे बांधकाम अनधिकृत होते तर, एका महिन्यापुर्वी किंवा एक वर्षापुर्वीच महापालिकेने का कारवाई केली नाही, असा सवाल शेलार यांनी विचारला आहे. 

राज्यातील ठाकरे सरकारचे वर्तन हे ठोकशाहिचेच असल्याचे आज दिसून आले, असेही शेलार म्हणाले. मुंबई साखळी बाॅम्ब स्फोट घडवून निष्पाप मुंबईकरांना मारणाऱ्या टायगर मेमनच्या माहिमच्या घरात, आॅफिसमध्ये महापालिका बुलडोझर घुसवणार नाही. मात्र, रस्त्यावरच्या खड्ड्यांवर बोलणाऱ्या रेडिओ जॉकी मलिष्काच्या घरात आणि कंगना रानौतच्या घरात पालिका अधिकारी शिरतात, असा पलटवारही आशिष शेलार यांनी केला.
तसेच, 'सामना'तून करण्यात आलेल्या टिकेला उत्तर देताना ते म्हणाले, '106 हुतात्म्यांना गोळ्या घालणाऱ्या काँग्रेस सोबतच सत्तेत बसलात. मुंबई मातेचा अपमान कोण करतय? बेईमानी नेमकी कोण करतेय? हुतात्म्यांचे तळतळाट तुम्हाला लागणार नाही, ऐवढे तपासून पहा'

-----------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Action on Kanganas bungalow wisely! Ashish Shelars criticism of the state government