
Mumbai News : सोशिक डोंबिवलीकर, व्हॉट्स अॅपचा आशिक; विवेक पंडित
डोंबिवली - कल्याण डोंबिवलीत प्रशासकीय राजवट लागू असून नागरी सुविधांची वाणवा आहे. रस्त्यांची सुरु असलेली कामे त्यामुळे होणारी वाहन कोंडी, धुळीचा त्रास, कचऱ्याची समस्या, रिक्षांची समस्या यांसारखे अनेक प्रश्नांना सर्वसामान्य नागरिक दररोज तोंड देत आहे.
सोशल मिडीयावर आवाज उठविणारा सामान्य नागरिक प्रत्यक्षात कृती काही करत नसल्याचे दिसून येते. झोपेच सोंग घेतलेल्या नागरिकांना जागे करण्यासाठी विद्या निकेतन शाळेचे संस्थापक विवेक पंडीत यांनी शाळेच्या बसवर एक फलक लावला आहे. 'सोशिक डोंबिवलीकर व्हाॅट्स अॅप चा आशिक, रस्त्यावर उतरणार नाही' असे म्हणत पंडीत सरांनी जनतेचे कान पिळले आहेत.
याविषयी पंडीत सर म्हणाले, कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत लोकप्रतिनिधींची मुदत संपल्यानंतर प्रशासकीय राजवट येथे लागू झाली हे. शहरात नागरी असुविधा असूनही कोणीही त्याच्या विरुद्ध आवाज उठवित नाही.
नगरसेवक माजी झालेले आहेत त्यामुळे प्रशासन त्यांना जुमानत नाही. कोणीतरी याविरोधात आवाज उठविला पाहीजे. शाळा म्हणजे फक्त मुलांना शिकविणे नाही. मुलांमधले दोष दुरुस्त करुन त्यांना चांगली शिकवण शाळेत दिली जाते.
तसेच समाजातही काही दोष असून ते ही दूर केले पाहीजेत. झोपलेल्यांना उठवावे लागते, आपल्याकडे झोपेचे सोंग घेतलेले जास्त आहेत असे पंडीत सर म्हणाले. शनिवार - रविवार गाड्या काढून फिरायला म्हणून पळून जाती.
पण एखादा दिवस केडीएमसीच्या ऑफिसमध्ये जाऊन समस्यांविषयी कोणी जाब विचारत नाही. सामान्य नागरिकांचे डोळे उघडण्यासाठी हा संदेश आहे असे पंडीत म्हणाले. डोंबिवली नामक अति सुशिक्षित पण बहुतांशी उदास असणाऱ्या नागरिकांना, नागरी सुविधा योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात मिळत नाहीत.
रस्ते सिमेंट चे करताना एव्हढे उंच करतात की आजूबाजूची घरे, पावसाळ्यात पाण्याने घेरली जातील. कचऱ्याचे ढीग दिसतात. केडीएमसीच्या डेव्हल्पमेंट योजनांत डोंबिवलीला काय स्थान आहे ? सर्व जाणीव असूनही, नागरिक कधी प्रशासनाला धारेवर धरत नाहीत... वेळ नाही आणि बऱ्याच वेळा प्रशासकीय अधिकारी उपलब्ध नाहीत.
शाळांनी, नुसते मुलांना नागरिकशास्त्र शिकवू नये. तर नागरी जीवनातील त्रुटींवर, संबंधितांना जाब विचारला पाहिजे आणि नागरिकांना, त्यांच्या ह्या बाबतीतील जबाबदारीची जाणीव करून देणे आवश्यक आहे. बॅनर मुळे, निदान लोकांना / प्रशासनाला, आपले काय चुकते ह्याचे भान येईल हा यामागचा उद्देश.
विवेक पंडीत, संस्थापक, विद्यानिकेतन शाळा.
काय आहे संदेश...
डोंबिवली शहर अति सुशिक्षित,
नाही कुणास वेळ, फावते सुस्त प्रशासनाचे
कचरा ढीग वाढती, सिमेंट रस्ते उंचावती
पावसाळ्याची चिंता कोणासही नाही
डोंबिवलीकर सोशिक, व्हॉट्स अॅपचा आशिक
रस्त्यावर उतरणार नाही
येतील निवडणुका, झळकतील आश्वासने
होतील मेळावे, पण होणार काही नाही
तस्मात्, ठेविले प्रशासने, तैसेचि रहावे
सुविधांची अपेक्षा, करु नये