पाच तासांनंतर गिर्यारोहक दरीतून बाहेर

सकाळ वृत्तसेवा
Monday, 23 September 2019

नवी मुंबई येथून सहा गिर्यारोहकांची टीम शनिवारी (ता. २१) पेब किल्ल्यावर गिर्यारोहणासाठी आली होती; परंतु त्यातील एकाच पाय घसरून तो ५०० फूट दरीत कोसळला.

नेरळ (बातमीदार) : नवी मुंबई येथून सहा गिर्यारोहकांची टीम शनिवारी (ता. २१) पेब किल्ल्यावर गिर्यारोहणासाठी आली होती; परंतु त्यातील एकाच पाय घसरून तो ५०० फूट दरीत कोसळला. घटनेची माहिती मिळताच नेरळ पोलिस व माथेरान येथील ‘सह्याद्री रेस्क्‍यू टीम’ने पाच तासांचे अथक प्रयत्न करत व्यक्तीचे प्राण वाचवले.

पेब किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी नवी मुंबई व कल्याण येथून सहा जणांचा एक ग्रुप नेरळ येथे आला होता. सकाळी त्यांनी नेरळ आनंदवाडी येथून मार्गक्रमण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी स्थानिक आदिवासी यांनी त्यांना वाटाड्या सोबत घेऊन जा, असा सल्ला दिला; मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत सदर ग्रुप किल्ल्याच्या दिशेने पुढे गेला. यात तीन महिलांचाही समावेश होता. किल्ल्याच्या जवळपास पोहचताच दुपारी १ च्या सुमारास त्यातील कल्याण येथील रमेश कुमार रामनाथन यांचा पाय घसरून ते ५०० फूट दरीत कोसळले. त्यांना हाक मारण्याचा त्यांनी प्रयत्न केला. तेव्हा खालच्या बाजूने त्यांना ओरडण्याचा आवाज आला.

प्रसंगावधान राखत ग्रुपमधील सदस्यांनी नेरळ पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पडलेली व्यक्ती जिवंत असल्याचे समजताच नेरळ पोलिसांनी माथेरानच्या ‘सह्याद्री रेस्क्‍यू टीम’ला पाचारण केले. या दोन्ही पथकांनी पेब किल्ला गाठला. रामनाथन यांचा फोन सुरू असल्याने त्यांनी आपले लोकेशन पाठवले होते. त्यामुळे त्यांना शोधणे ‘रेस्क्‍यू टीम’ला सोपे झाले. टीमने रात्री सुमारे साडेअकराच्या सुमारास रामनाथन यांना सुखरूप नेरळ येथे आणले. या कार्यात पोलिस शिपाई घनश्‍याम पालवे, बंडू सुळ, रमेश बोडके व होमगार्ड उगले, सुनील कोळी, संदीप कोळी, उमेश मोरे, संतोष केळगणे आदी सामील झाले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: After 5 hrs trekkers out of the valley