एकाच्या मृत्यूनंतर दुसऱ्या गर्भाला वाचवले
एकाच्या मृत्यूनंतर दुसऱ्या गर्भाला वाचवले

एकाच्या मृत्यूनंतर दुसऱ्या गर्भाला वाचवले

नवी मुंबई : जुळ्या मुलांच्या गर्भधारणेदरम्यान अनेकदा आई किंवा बाळाच्या आरोग्यास समस्या उद्‌भवतात. काही कारणास्तव एक गर्भ मृत झाल्यास दुसरा गर्भ वाचवणे डॉक्‍टरांसाठी जिकिरीचे होते. खारघर येथील एका खासगी रुग्णालयातील डॉक्‍टरांनी अशा कठीण स्थितीवर मात करत अशा जुळ्यांमधील एक गर्भ मृत झाल्यानंतरही दुसरा गर्भ सुरक्षित ठेवत एका मातेचे बाळंतपण यशस्वीरीत्या पार पाडले. 

एल ॲण्ड टी कंपनीच्या सामाजिक सेवा विभागात काम करणाऱ्या प्रीती अय्यर (३६) यांचे गर्भधारणेचे पहिले तीन प्रयत्न अपयशी ठरले होते. त्यानंतर त्यांना डायकोरिऑनिक  (फ्रॅटर्नल) जुळी गर्भधारणा झाली. गर्भधारणेनंतर १३ आठवडे ५ दिवसांनी त्यांच्या गर्भाशयाचे मुख आतून उघडू लागले. त्या वेळी टाका घालून गर्भाशयाचे मुख बंद करण्यात आले. दोन आठवड्यांनी पुन्हा टाका सैल झाला. त्यामुळे पुन्हा टाका घालावा लागला. याविषयी प्रसूती व स्त्री-रोगतज्ज्ञ डॉ. अनु वीज यांनी सांगितले, की प्रीती यांचे गर्भाशयाचे मुख सैल होते. त्यामुळे सुरुवातीस मुखाला टाका घालून गर्भ वाचवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता; मात्र त्या १५ व्या आठवड्यात आल्या तेव्हा त्यांच्या गर्भाशयाच्या एका बाजूने पाणी जाऊ लागले होते. तसेच त्यांना तीव्र वेदना सुरू झाल्या होत्या. त्यामुळे गर्भाशयाला घातलेला टाका उसवल्याने एक गर्भ बाहेर आला. त्याची काहीच हालचाल होत नसल्याने आणि त्याचे हृदयाचे ठोकेही बंद पडल्याने ते मृत असल्याची खात्री पटली. मृत गर्भ नैसरगिकरीत्या बाहेर आले होते. त्यामुळे पुढील २४ तासात दुसऱ्या गर्भाच्या हालचालीवर लक्ष ठेवण्याचा निर्णय अय्यर दाम्पत्याशी बोलून घेण्यात आला. 

एक गर्भ मृत झाल्यानंतरही गर्भाशय निरोगी होते आणि दुसरे बाळ गर्भाशयात उत्तम स्थितीत होते. त्यामुळे डॉक्‍टर वीज यांनी पुन्हा गर्भाशयाला टाका घालण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर २५ आठवडे ६ दिवसांनी ५ जुलै रोजी ८४० ग्रॅम वजनाच्या बाळाला जन्म दिला. या बाळाला लगेच एनआयसीयूमध्ये ठेवण्यात आले. बालरोगतज्ज्ञ डॉ. सुरेश बिराजदार म्हणाले, की बाळाला तीन दिवसांच्या आत स्तनपान सुरू केले. वजन व रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी ते उपयुक्त ठरले. या बाळाचे नाव शक्ती ठेवण्यात आले असून, गर्भात असल्यापासून त्याने जगण्याची जिद्द सोडली नव्हती. ही बाब त्याला मोठेपणी बळ देणारी ठरेल. असा विश्‍वास अय्यर दाम्पत्याने व्यक्त केला आहे.

जुळ्यांची गर्भधारणा जोखमीचे असते. प्लासेंटोची स्थिती, आईचे वय, वैद्यकीय समस्या व प्रसूतीविषयक गुंतागुंतीमुळे ते अधिक कठीण होते. जुळ्यांपैकी एकाचा गर्भाशयातच मृत्यू झाल्यास दुसऱ्या बाळाच्या आयुष्यालाही धोका असतो. वाचलेल्या जुळ्याला सेरेब्रल पालसी होण्याचा किंवा मेंदूचा अन्य विकार होण्याची शक्‍यता असते. 
- डॉ. अनु विज, प्रसूती- स्त्री-रोगतज्ज्ञ.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com