मुसळधारेनंतर जनजीवन पूर्वपदावर!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जुलै 2019

ठाणे शहरासह जिल्ह्यात शुक्रवारी रात्रीपासून धुमाकूळ घातलेल्या पावसाने रविवारी मात्र थोडी उसंत घेतली. त्यामुळे जनजीवन काही प्रमाणात रुळावर आले होते; पण ग्रामीण भागात धुवाधार पावसामुळे वीजपुरवठा खंडित होऊन पाणीपुरवठ्यावर परिणाम झाल्याने नागरिकांची मोठी कोंडी झाली.

ठाणे : ठाणे शहरासह जिल्ह्यात शुक्रवारी रात्रीपासून धुमाकूळ घातलेल्या पावसाने रविवारी मात्र थोडी उसंत घेतली. त्यामुळे जनजीवन काही प्रमाणात रुळावर आले होते; पण ग्रामीण भागात धुवाधार पावसामुळे वीजपुरवठा खंडित होऊन पाणीपुरवठ्यावर परिणाम झाल्याने नागरिकांची मोठी कोंडी झाली. त्यातच मध्य रेल्वेने रविवारचा मेगाब्लॉक रद्द केल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला. जागोजागी पाणी साचल्याने अनेक चाकरमान्यांनी शनिवारी कल्याणच्या पुढे प्रवास टाळून ठाणे अथवा मुंबई परिसरात आपल्या नातेवाईक अथवा मित्रांकडे राहणे पसंत केले होते. रविवारी पावसाचा जोर ओसरल्यानंतर या चाकरमान्यांनी आपले घर गाठले.

शुक्रवारी रात्रीपासून कोसळणाऱ्या पावसाने पुन्हा ‘२६ जुलै २००५’ची आठवण करून दिली होती. जिल्ह्यात प्रथमच २४ तासांत सरासरी २३९.९३ मिमी पाऊस झाला. ठाणे शहरात २४ तासांत १६० मिमी पाऊस झाला. दिवा, भिवंडी, कल्याण, टिटवाळा, बदलापूर आदी परिसरातील अनेक बैठ्या घरांमध्ये तसेच तळ मजल्यावरील घरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरले होते. रविवारचा दिवस साफसफाई करण्यात गेला. रविवारी ठाणे 
शहरात केवळ ५० मिमी पावसाची नोंद करण्यात आली. 

साथीच्या आजारांचा धोका
मुसळधार पावसामुळे शहरी आणि ग्रामीणमधील सखल भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. २४ तासांनंतर परिस्थिती पूर्वपदावर आली असून, बाधितांनी घरातील कचरा साफ करण्यास सुरूवात केली आहे. दरम्यान, हा कचऱ्याची वेळेवर विल्हेवाट न लावल्यास साथीचे आजार डोके वर काढण्याची शक्‍यता आहे.

मुरबाडमध्ये आता साप, विंचू घरांमध्ये आश्रयाला
मुरबाडमध्ये ‘२६ जुलै’च्या पावसाने घरांमध्ये पाणी शिरून नुकसान झालेल्या नागरिकांचे भय अजून संपले नाही. घरातील पाणी ओसरले असले तरी पुराच्या पाण्यातून वाहत आलेले साप, विंचू यांनी आपला जीव वाचविण्यासाठी घरांमध्ये आश्रय घेतल्याने पूरग्रस्त नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. मुरबाड शहरातील कल्याण नगर, विद्यानगर, साईसंसार, गुरुकुल सोसायटी, सोनारपाडा, मातानगर, नागाचा खडक भागात राहणाऱ्या शेकडो नागरिकांच्या घरात पुराचे पाणी घुसल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले. या नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे काम महसूल विभागाने सुरू केले आहे.

पूरग्रस्त गावांमध्ये भयानक परिस्थिती 
कल्याण तालुक्‍यातील चारही नद्यांना पूर आला होता. आतापर्यंत पुरात अडकलेल्या ५३० च्या वर लोकांना वाचविण्यात यश आल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. पूर ओसरल्यानंतर पूरग्रस्त गावांत भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: After the demolition, life is on the forefront!