निवडणुकीनंतरच नवी मुंबईत गुळगुळीत रस्ते!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 सप्टेंबर 2019

महापालिका हद्दीतील गावांमधील मूळ रस्ते व्हाईट थिन टॉपिंग या तंत्रज्ञानाद्वारे विकसित करण्याच्या कामाला विधानसभा निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे खीळ बसली आहे. ऑगस्ट महिन्यात सर्वसाधारण सभेत मंजूर झालेल्या या प्रस्तावानंतर निविदा प्रक्रिया राबवली गेली नसल्याने आता ही कामे थेट निवडणुकांनंतर राबवली जाणार आहेत.

नवी मुंबई : महापालिका हद्दीतील गावांमधील मूळ रस्ते व्हाईट थिन टॉपिंग (दिर्घ काळ सुस्थितीत राहणारे) या तंत्रज्ञानाद्वारे विकसित करण्याच्या कामाला विधानसभा निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे खीळ बसली आहे. ऑगस्ट महिन्यात सर्वसाधारण सभेत मंजूर झालेल्या या प्रस्तावानंतर निविदा प्रक्रिया राबवली गेली नसल्याने आता ही कामे थेट निवडणुकांनंतर राबवली जाणार आहेत. त्यामुळे नवी मुंबईतील गावठाणांतील ग्रामस्थांना निवडणुकीपर्यंत गुळगुळीत रस्त्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

गेल्या वर्षी राज्यभरात चांगला पाऊस पडल्यामुळे सायन-पनवेल महामार्गासहित नवी मुंबईतील रस्त्यांना फटका बसला होता. बेलापूर, नेरूळ, वाशी, ऐरोली व दिघा येथील रस्ते खराब होऊन अनेक ठिकाणी खड्ड्यांमुळे त्यांची पुरती चाळण झाली होती. त्यामुळे नागरिकांना महामार्गावरील वाहतूक कोंडीसोबतच अंतर्गत रस्त्यांवरील वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत होते.  महापालिका हद्दीतील बहुतांश गावांमधील मूळ रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे महापालिका हद्दीतील सर्व रस्ते व्हाईट थिन टॉपिंग तंत्रज्ञानाद्वारे विकसित करण्याचा निर्णय तत्कालीन आयुक्त डॉ. एन. रामास्वामी यांनी घेतला होता. 

त्यानुसार शिरवणे येथील मूळ रस्त्याचा विकास प्रयोगिक तत्त्वावर याच तंत्रज्ञानाच्या आधारावर करण्यात आला आहे. रस्ता पूर्णपणे खड्डेविरहित आणि गुळगुळीत असल्याने त्याच धर्तीवर सर्व गावांमधील मूळ रस्त्यांचा व्हाईट थिन टॉपिंग धर्तीवर विकास करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. या सर्व रस्त्यांकरिता तब्बल ४० कोटींचा खर्च अपेक्षित होता. यात बेलापूर-आग्रोळी गाव उड्डाणपूल, नेरूळ सेक्‍टर- ४४, नेरूळ-शिरवणे लघुउद्योजक संकुल, नेरूळ-दरावे गाव, वाशी-तुर्भे कोपरी येथील हनुमान मंदिर ते कोपरी चौक दरम्यानचा रस्ता अल्ट्रा थिन व्हाईट टॅपिंगचा थर टाकून दुरुस्त केला जाणार आहे. त्याकरिता २ कोटी ६६ लाख रुपये इतका खर्च करण्यास सर्वसाधारण सभेने मान्यता दिली आहे.

रबाळे, गोठिवली गावातील ग्रामस्थांना प्रतीक्षा 
खड्डे पडणे, रस्त्यावरील डांबराचा थर नाहीसा होणे, रस्त्याला भेगा पडणे अशा वारंवार येणाऱ्या समस्यांपासून ग्रामस्थांची सुटका करण्यासाठी महापालिकेतर्फे रबाळे व गोठिवली गावातील रस्ते थिन व्हाईट टॉपिंग लेयर तंत्रज्ञानाने तयार केले जाणार आहेत. या तंत्रज्ञानामुळे रस्त्यांचा दर्जा सुधारणार असून रस्त्यांचे आयुर्मान वाढण्यास मदत होणार आहे. घणसोली विभागातील रबाळे व गोठिवली गावातील रस्ते सिडकोकालीन असल्यामुळे त्यांची दुरवस्था झाली आहे. दोन्ही गावांमध्ये अंदाजे ६३० मीटर लांबीचे रस्ते तयार केले जाणार आहेत. हा रस्ता तयार करण्यासाठी महापालिकेला अंदाजे ७८ लाख ८७ हजार रुये इतका खर्च अपेक्षित आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: After the election smooth roads in Navi Mumbai!