नवी मुंबईतील मातब्बर नेत्यांना झटका; वाचा नेमकं काय झालं!

सकाळ वृत्तसेवा
Monday, 3 February 2020

पॅनेल पद्धतीने निवडणूक रद्द झाल्यानंतर एकसदस्यीय पद्धतीने होणाऱ्या महापालिका निवडणुकींच्या प्रारूप प्रभागरचनेच्या सोडतीने अनेक गाजलेल्या नगरसेवकांना "जोर का झटका' दिला. शनिवारी (ता.1) वाशीच्या विष्णुदास भावे नाट्यगृहात महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग प्रारूप रचना आणि आरक्षण सोडत जाहीर झाली. 

नवी मुंबई : पॅनेल पद्धतीने निवडणूक रद्द झाल्यानंतर एकसदस्यीय पद्धतीने होणाऱ्या महापालिका निवडणुकींच्या प्रारूप प्रभागरचनेच्या सोडतीने अनेक गाजलेल्या नगरसेवकांना "जोर का झटका' दिला. शनिवारी (ता.1) वाशीच्या विष्णुदास भावे नाट्यगृहात महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग प्रारूप रचना आणि आरक्षण सोडत जाहीर झाली. या सोडतीत आरक्षण पडल्यामुळे आजी-माजी महापौरांना, त्याचप्रमाणे विरोधी पक्षनेते, स्थायी समिती सभापती, सभागृह नेते, शिवसेनेचे गटनेते आणि नगरसेवक- नगरसेविकांना मोठा फटका बसला. 

ही बातमी वाचली का? पश्चिम मुंबईतील पाणीटंचाई संपणार

राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या सत्तांतरानंतर, नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. पॅनेल पद्धतीने होणारी निवडणूक रद्द झाल्यानंतर 111 प्रभागांसाठी एकसदस्यीय पद्धतीने निवडणूक होणार आहे. त्यासाठीची प्रारूप प्रभागरचनेची आरक्षण सोडत महापालिकेच्या निवडणूक विभागाने शनिवारी जाहीर केली. या सोडतीमध्ये बदललेल्या प्रभागांच्या आरक्षणांमुळे नगरसेवकपदाची स्वप्ने धुळीस मिळाली. नवी मुंबईतील सर्व कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी आपल्या प्रभागातील आरक्षण सोडतीची गेल्या काही दिवसांपासून मोठ्या आतुरतेने वाट पाहत होते. मात्र, ही सोडत जाहीर होताच विद्यमान महापौर जयवंत सुतार, विरोधी पक्षनेते विजय चौगुले, स्थायी समितीचे सभापती नवीन गवते, सभागृहनेते रवींद्र इथापे, शिवसेनेचे गटनेते द्वारकानाथ भोईर, माजी महापौर सुधाकर सोनावणे, माजी उपमहापौर अशोक गावडे व अविनाश लाड, माजी सभागृहनेते अनंत सुतार या दिग्गजांना आरक्षण लागल्याने मोठा फटका बसला आहे; तर नगरसेविका रंजना सोनावणे, विजय चौगुले, मुनावर पटेल, नगरसेवक किशोर पाटकर, नगरसेविका पूनम पाटील, नगरसेवक विशाल डोळस या लोकप्रतिनिधींचा प्रभाग महिला व विविध जातींसाठी आरक्षित झाल्याने त्यांना नवे प्रभाग शोधावे लागणार आहेत. या सोडतीची प्रक्रिया सरकारला सादर करण्यात आल्यानंतर, त्यावर नागरिकांच्या सूचना आणि हरकती मागविल्या जाणार आहेत. 

ही बातमी वाचली का? वनहक्कांसाठी आदिवासी राज्यपालांच्या दारात
 
यांना लागली लॉटरी 
या सोडतीत सायली शिंदे, उज्ज्वला झंजाड, स्वप्ना गावडे, लक्ष्मीकांत पाटील, मोनिका पाटील, वैशाली नाईक, निर्मला कचरे, सोमनाथ वास्कर, मीरा पाटील, नेत्रा शिर्के यांना लॉटरी लागली आहे; तर पालिकेच्या सभागृहातील सुधाकर सोनावणे, एम. के. मढवी, शिवराम पाटील, प्रशांत पाटील, जगदीश गवते, नवीन गवते यांच्यासह पत्नीचे प्रभाग बदलल्याने या दाम्पत्यांच्या जोड्या फुटल्या आहेत. 

ही बातमी वाचली का? महाराष्ट्राची ऐतिहासिक उपेक्षा!

सोडत आधीच फुटली? 
प्रभागरचना आणि आरक्षण सोडतीमधून जाहीर होणार असल्यामुळे सर्वच लोकप्रतिनिधींची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. त्यामुळे प्रत्येक जण सोडतीआधीच आपल्या प्रभागाची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करीत होता. परंतु पालिकेच्या निवडणूक विभागात कार्यरत असणाऱ्या काही मर्जीतील कर्मचाऱ्यांकडून आरक्षणामुळे बदललेल्या प्रभागाची माहिती लोकप्रतिनिधींना सोडतीआधीच मिळत होती. कॉंग्रेस इंटकचे जिल्हाध्यक्ष रवींद्र सावंत यांनी याबाबत प्रभागात आक्षेप नोंदवला. तसेच ही आरक्षण सोडत आणि प्रारूप रचना निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी संगनमत करून, आधीच निश्‍चित केली असल्याचा आरोप केला. त्यामुळे ही आरक्षण सोडत संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. 

निवडणूक आयोगाकडून प्रभाग रचना व आरक्षणे निश्‍चित केली जातात. उर्वरित प्रभागांची आरक्षणे ही त्याच दिवशी सर्वांच्या उपस्थितीत समोरासमोर सोडत काढून केली जातात. या परिस्थितीत संगनमताचे आरोप करणे चुकीचे आहे. ज्यांना काही हरकत असेल त्यांच्यासाठी 7 फेब्रुवारीपर्यंत हरकती नोंदवण्याकरिता मुदत आहे.
- अण्णासाहेब मिसाळ, आयुक्त, महापालिका

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: After leaving the reservation, a blow to top leaders in Navi Mumbai