प्लास्टर ऑफ पॅरिस गणेशमूर्तींचे पुन्हा विसर्जन

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 सप्टेंबर 2019

पावसामुळे अनेक गणेशभक्तांनी वाढलेल्या पाण्याच्या पातळीमुळे समुद्रामध्ये विसर्जन करणे टाळत नदी, तलाव यांचा वापर केला. मात्र, दोन दिवसांतच प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती पाण्याबाहेर आल्याने त्यांचे विसर्जन पुन्हा करण्यात आले.

श्रीवर्धन (बातमीदार) : श्रीवर्धन तालुक्‍यात पाच दिवसांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन अनेक ठिकाणी करण्यात आले. या वेळी पावसामुळे अनेक गणेशभक्तांनी वाढलेल्या पाण्याच्या पातळीमुळे समुद्रामध्ये विसर्जन करणे टाळत नदी, तलाव यांचा वापर केला. मात्र, दोन दिवसांतच प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती पाण्याबाहेर आल्याने त्यांचे विसर्जन पुन्हा करण्यात आले.

तालुक्‍यातील बोर्लीपंचतन गावामध्ये गणेशमूर्तींचे विसर्जन मोठ्या भक्तिभावाने नदीवरील ग्रामपंचायतीने बांधलेल्या गणेश घाटावर करण्यात आले. या वेळी पावसाचा जोर कायम असल्याने नदीला पुरेपूर पाणी होते. विसर्जनानंतर दोन ते तीन दिवसांनी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या अनेक गणेशमूर्ती पाण्याबाहेर आल्या होत्या. पाच ते सहा दिवस उलटूनही या मूर्तींचे विघटन झाले नाही. त्यामुळे मूर्ती विद्रूप झाल्याचे दिसून येत होते. याचे गांभीर्य लक्षात घेऊन माजी सरपंच निवास गाणेकर, नंदकुमार भाटकर, संदेश म्हसकर आणि त्यांच्यासोबत अनेक गणेशभक्तांनी तत्काळ किनाऱ्यावर आलेल्या आणि पाण्यावर तरंगणाऱ्या मूर्तींचे पुन्हा विसर्जन केले. त्याचप्रमाणे यापुढे मूर्ती लहान व शाडूच्या मातीचीच आणावी, जेणेकरून पर्यावरणाचा ऱ्हास व गणेशमूर्तींची विटंबना न होता, तिचे विसर्जन सुरळीत होईल. तसेच, त्याचे पावित्र्य राखले जाईल, असे आवाहन करून आपण त्यासाठी नक्कीच प्रयत्न करणार असल्याचेही सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Again immersion of plaster of paris GaneshMurti