वय वर्ष 20 पण चोरल्या तब्बल 10 बुलेट; नंबर प्लेट काढून 40-50 हजारात विक्री

दीपक शेलार
Saturday, 12 September 2020

  • बुलेट चोरणाऱ्या तिघांना अटक 
  • 10 वाहने जप्त; कोपरी पोलिसांची कारवाई

ठाणे ः बुलेट या महागड्या दुचाकी वाहने चोरणाऱ्या तिघांना कोपरी पोलिसांनी अटक केली आहे. प्रतिक प्रमोद पालकर (वय 22), विशाल विजय चाळके (वय 26) आणि नितीन वाडकर (वय 20) अशी आरोपींची नावे असून त्यांच्याकडून मुंबई, ठाणे, नवीमुंबई तसेच पनवेल परिसरातून चोरलेल्या दहा बुलेट दुचाकी जप्त करण्यात आल्या. आरोपींनी आणखी वाहने चोरल्याची शक्यता असल्याने त्याबाबत तपास सुरु असल्याचे सहायक पोलिस आयुक्त प्रकाश निलेवाड यांनी सांगितले.

काय सांगता! मेट्रोमुळे मुंबईत मलेरियाचा प्रसार? दक्षिण मुंबईत 70 टक्के रुग्ण; इमारतींमध्येही वाढता धोका

पुर्वदृतगती महामार्गावरील कोपरी नजीक दुचाकी चोरटे येणार असल्याची माहिती कोपरी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार शुक्रवारी (ता. 11) वरिष्ठ पोलिस निरिक्षक जितेंद्र आगरकर, पोलिस निरीक्षक दत्ता गावडे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरिक्षक डी.टी.धोंडे, हवालदार पोपट फडतरे, पोलिस नाईक शुक्लेश्वर बेलदार, पोलिस शिपाई सतिष कुंदे आणि सहायक उपनिरिक्षक राजेंद्र पाटील यांच्या पथकाने सापळा रचला. तेव्हा आरोपी प्रतिक पालकर आणि विशाल चाळके या दोघांना रस्त्यालगत उभ्या असलेल्या बुलेटची चाचपणी करताना रंगेहाथ पकडले. तपासात तिसरा साथीदार वाडकर यालाही अटक केल्यानंतर चौकशीत या त्रिकुटाचे अनेक कारनामे समोर आले. मुलुंड नवधर, सीबीडी बेलापूर, कळंबोली, पनवेल-खांदेश्वर, नेरूळ, काशिमीरा, राबोडी, वागळे इस्टेट आणि खडकपाडा आदी ठिकाणावरुन चोरी केलेल्या 14 लाख 65 हजार किमतीच्या दहा बुलेट गाड्या जप्त केल्या. 

अभिनेते कुशल बद्रिकेंच्या व्हिडिओची आमदार प्रताप सरनाईकांकडून दखल; घोडबंदर रस्त्यावर होणार सुरक्षेचे उपाय

40-50 हजारात विक्री
जेमतेम दहावीपर्यत शिकलेला पालकर हा पूर्वी नवी मुंबईत खासगी वाहनावर चालक होता. सर्वप्रथम त्याने आपल्या सख्या मामाचीच बुलेट चोरुन विकली होती. त्यानंतर दोन मित्रांना सोबत घेत बुलेट चोरण्याचे सत्र सुरु केले होते. चोरलेल्या बुलेटची नंबर प्लेट काढून नंतर गाडीची कागदपत्रे देतो असे सांगत 40-50 हजारात दुचाकींची विक्री करत होते.

-------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Age 20 but stole a whopping 10 bullets