शेतीप्रधान जिल्‍ह्यात क्षेत्र निम्म्याने घटले

संग्रहित
संग्रहित

रोहा : रायगड जिल्ह्यात काही वर्षांपूर्वी सुमारे 20 ते 22 हजार एकर क्षेत्रावर उन्हाळी भातशेती व्हायची. त्यातून सुमारे चार लाख टन भाताचे उत्पन्न मिळत असे; मात्र आता जिल्ह्यातील शेती क्षेत्रात निम्म्याने घट झाली असून, 10 ते 12 हजार एकर क्षेत्रच भात लागवडीखाली आल्याची माहिती कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. जिल्ह्यातील वाढते शहरीकरण, विविध प्रकल्प व शेतीबाबत अनास्था, वाढता खर्च यामुळे लागवडीखालील शेतीक्षेत्र कमी होत आहे.

महत्‍वाची बातमी : एसटीवर दिवाळखोरीचे सावट 

जिल्ह्यातील कोलाड पाटबंधारे विभागाच्या अंतर्गत सुमारे 14 धरणे आहेत. यात फणसाड, वावा, सुतारवाडी, आंबेघर, कोंडगाव, कवेळे, उन्हेरे, पाभरे, संदेरी, वरंध, खिडवाडी, कोथुर्डे, खैरे, भिलवले या धरणांचा समावेश आहे. जिल्ह्यात भिरा (माणगाव तालुका), भिवपुरी (कर्जत तालुका) व खोपोली येथे विद्युतनिर्मिती केंद्रे आहेत.

कर्जत तालुक्‍यातील भिवपुरी विद्युतनिर्मिती केंद्रातून सोडलेले पाणी (अवजल) अडवून त्याच तालुक्‍यात राजनाला धरण बांधण्यात आले आहे. खालापूर तालुक्‍यातील खोपोली जलविद्युत केंद्रातील पाणी पाताळगंगा नदीत सोडून या नदीवर पाताळगंगा प्रकल्पांतर्गत धरण बांधण्यात आले आहे.

माणगाव तालुक्‍यातील भिरा विद्युत केंद्रातील पाणी कुंडलिका नदीत सोडून त्यावर कोलाडजवळ डोळवाहळ व काळ प्रकल्पांतर्गत धरण बांधण्यात आले आहे. या धरणांच्या सिंचनाखाली जिल्ह्यातील हजारो एकर जमीन उन्हाळी पिकास योग्य झाली आहे. यात भातपीक घेतले जाते. 

जिल्ह्यात नद्या, त्यावरील लहान 28 धरणे, पाटबंधारे, कालवे यावर भातशेती पिकवली जाते. या वर्षी परतीच्या पावसाचा मुक्काम लांबल्याने अधिक काळ शेतात ओलसरपणा होता. जमिनीत वापसा तयार होण्यास उशीर झाला. त्यामुळे कालव्याचे पाणी उशिरा सोडण्यात आले.

जानेवारीच्या सुरुवातीला शेतकऱ्यांनी पेरणीची कामे पूर्ण केली होती. 21 दिवसांत रोपे पूर्ण वाढून आता आवणी सुरू झाली आहे. आठवडाभरात लावणीची कामेही आटोपती घेतली जातील, अशी माहिती शेतकऱ्यांनी दिली. लावणीनंतर 45 दिवसांत भातपीक कापणीस तयार होते.

मार्च, एप्रिलपर्यंत कापणी पूर्ण करून नंतर झोडणी, मळणी वगैरे कामे आटोपताना मे महिना संपून जातो. या दरम्यान वळवाच्या पावसाने हजेरी लावल्यास उन्हाळी भातपिकेही नष्ट होण्याची भीती शेतकऱ्यांच्या मनात असल्याने ते वेळेवर शेतीची कामे आटोपून घेण्यासाठी तत्पर आहेत. 

जानेवारीच्या सुरुवातीला पेरणी पूर्ण केली होती. आता आवणी व लावणीच्या कामांना सुरुवात केली आहे. पावसाळ्यापेक्षा उन्हाळी भातशेतीत उत्पादन अधिक मिळत असल्याचे शेतकरी अशोक हिलम यांनी सांगितले.

जिल्ह्यात सुमारे 10 ते 12 हजार एकर क्षेत्रावर उन्हाळी भातशेती केली जाते. या वर्षी पाण्याची मुबलकता अधिक असल्याने उत्पादन जास्त मिळण्याची आशा वाटत असल्याचे बळीराजा शेतकरी संघटनेचे खजिनदार दगडू बामुगडे यांनी सांगितले.

उन्हाळी भातशेती क्षेत्रात गेल्या काही वर्षांत निम्म्याने घट झाली आहे. या वर्षी 10 ते 12 हजार एकरवर लागवड सुरू असून, त्यातून सुमारे दोन ते अडीच लाख क्विंटल उत्पादन मिळण्याची शक्‍यता असल्याचे जिल्हा कृषी अधिकारी पांडुरंग शेळके यांनी सांगितले.  

बियाणे, खत, मजुरी वाढल्याचा फटका 
एका एकरातून पावसाळी 17 ते 18 क्विंटल भात पिकतो, तर उन्हाळी हेच उत्पादन 20 क्विंटलपर्यंत मिळते. भाताला 800 ते 1200 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळतो; मात्र बियाणे, खते महागली, मजुरी वाढल्याने भातशेती परवडणारी राहिली नसल्याचे शेतकरी सांगतात. जिल्ह्यात शेतमालक जमीन आदिवासी कुटुंबांना तीनदलीने देतात; तर मजुरी, व्यवसाय नसल्याने आदिवासी जमीन कसत आहेत असे सांगतात. तीनदली म्हणजे आलेल्या पिकाचे तीन भाग करून एक भाग जमीनमालकाला व दोन भाग कसणाऱ्या शेतकऱ्याला मिळतो. पेंढ्याचेही असेच हिस्से केले जातात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com