'एमएमआर' क्षेत्राला विजेबाबत आत्मनिर्भर करण्याचे ध्येय! ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची माहिती

'एमएमआर' क्षेत्राला विजेबाबत आत्मनिर्भर करण्याचे ध्येय! ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची माहिती

मुंबई  ः देशाची आर्थिक राजधानी मुंबईसह आसपासचे एमएमआर क्षेत्र हे दर्जेदार विजेबाबत आत्मनिर्भर व्हावे, यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी आज दिली. महामुंबई विभागात मागील महिन्यात वीजपुरवठा बंद झाल्यासंदर्भात आज त्यांनी अदानी इलेक्‍ट्रिसिटीच्या मुख्य केंद्राला भेट देऊन माहिती घेतली. महामुंबई विभाग ऊर्जेबाबत सक्षम कसा होईल, या दृष्टिकोनातून आपण सोमवारी (ता. 2) टाटा वीज केंद्राला भेट दिली. आता लवकरच बेस्ट वीजनिर्मिती कंपनीच्या अधिकाऱ्यांशी बोलून यासंदर्भात कृती आराखडा तयार करण्यात येईल, असेही त्यांनी या वेळी सांगितले. 

राऊत यांनी आज अदानी इलेक्‍ट्रिसिटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांच्या अडचणी तसेच विस्ताराच्या योजना समजावून घेतल्या. यासंदर्भात सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. मुख्यमंत्र्यांनी सोमवारी (ता. 2) विविध कंपन्यांशी केलेल्या करारांनुसार आता महामुंबई क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर डाटा सेंटर तसेच विजेवर चालणाऱ्या वाहनांची चार्जिंग स्टेशन उभारली जाणार आहेत. या दोन्ही बाबींमुळे मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होणार असल्याने त्यांना मोठ्या प्रमाणावर अखंडित वीजपुरवठा लागेल, असेही राऊत या वेळी म्हणाले. या वेळी ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता, महापारेषणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे, अदानी इलेक्‍ट्रिसिटी मुंबई लि.चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कंदर्प पटेल तसेच अदानी इलेक्‍ट्रिसिटीचे व महावितरणचे अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 

महामुंबई क्षेत्रात विविध कंपन्यांच्या एक कोटींपेक्षाही जास्त जोडण्या असून, येथील लोकसंख्या साडेचार कोटींपेक्षाही जास्त आहे. त्यामुळे या क्षेत्रालाही मोठ्या प्रमाणावर अखंडित विजेची गरज आहे. त्यामुळे यासंदर्भात लवकरच कृती आराखडा तयार करण्यात येईल. 
- नितीन राऊत,
ऊर्जामंत्री 

Aim to make MMR region self sufficient in electricity

----------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com