ऐरोलीत महायुतीच्या भिंतीला तडे?

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 ऑक्टोबर 2019

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात खासदार संजय राऊत यांनी आगीत तेल ओतणाऱ्या केलेल्या भाषणामुळे ऐरोलीतील शिवसेना-भाजप महायुतीच्या भिंतींना तडे गेल्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

नवी मुंबई : शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात खासदार संजय राऊत यांनी आगीत तेल ओतणाऱ्या केलेल्या भाषणामुळे ऐरोलीतील शिवसेना-भाजप महायुतीच्या भिंतींना तडे गेल्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्यांना आस्मान दाखवण्याची भाषा करताना राऊत यांनी नवी मुंबईचा उल्लेख करून माजी मंत्री गणेश नाईक यांचे नाव न घेता थेट टीका केली आहे. राऊत यांच्या टीकेमुळे नाईकांबाबत शिवसैनिकांमध्ये अजूनही जुनी खदखद असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखीत झाले आहे.

नवी मुंबईत शिवसेनेचे ३८ नगरसेवक असून, सर्वाधिक नगरसेवक एकट्या ऐरोली विधानसभा मतदारसंघात आहेत. बेलापूर आणि ऐरोली मतदारसंघात शिवसेनेची चांगली ताकद असल्याने सेनेला एकतरी जागा मिळावी. अशी सर्व शिवसैनिकांची इच्छा होती. ऐरोली मतदारसंघातून तब्बल सहापेक्षा जास्त शिवसेनेचे पदाधिकारी उमेदवारीसाठी इच्छुक होते. मात्र, ऐनवेळी गणेश नाईक कुटुंबीयांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे शिवसेनेची फक्त जागाच गेली नाही; तर सेनेच्या पदाधिकाऱ्यांना नाईकांचा झेंडा खांद्यावर घेऊन काम करावे लागणार आहे. त्यामुळे नाईकांविरोधात शिवसैनिकांचा जनक्षोभ उफाळून बाहेर आला. आज त्याचीच पुनरावृत्ती दादर येथे संपन्न झालेल्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात झाली. 

राज्यात युतीचे राज्य येणार असेल तर त्याचे नेतृत्व शिवसेनेकडे असेल हे सांगताना राऊतांनी शिवसेनेला ज्यांनी संपवण्याची भाषा केली; ज्यांनी शिवसेनेवर घाव घातले, पाठीत वार केले, आज तेच घायाळ होऊन धारातीर्थ पडले आहेत असे विधान केले. याचे उदाहरण देताना राऊत यांनी मग ते कोकण असो, नवी मुंबई असो अथवा येवला असो असे सांगून गणेश नाईक यांचे नाव न घेता थेट टीका केली. राऊत यांच्या टीकेमुळे नाईकांवर नाराज असलेल्या शिवसेनेच्या जुन्या निष्ठावंतांना एक प्रकारे नाईकांचे काम न करणाऱ्याचे बळ मिळाले आहे. पक्षश्रेष्ठींमध्येच अद्याप मनोमीलन झाले नसल्याने ऐरोलीत नाईकांचे काम करणाऱ्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे मनोमीलन कितपत झाले असेल याबाबत शंका उपस्थित होत आहे. 

काय बोलले संजय राऊत
“मी आज जाहीरपणे सांगतो, जे जे शिवसेनेच्या अंगावर आले, ज्यांनी ज्यांनी शिवसेना संपवण्याची भाषा केली, ज्यांनी पाठीत वार केले, घाव घातले; आज ते स्वतः घायाळ होऊन धारातीर्थी पडले आहेत. मग ते कोकण असेल, नवी मुंबई असेल नाही तर येवला असेल, प्रत्येक ठिकाणी शिवसेनेचा उमेदवार जिंकेल.”   
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In the airoli may wall of Mahayuti collapses?