मराठा आरक्षण : सर्वपाक्षीय बैठकीत उद्धव ठाकरेंनी मांडलेल्या गोष्टी आणि फडणवीसांनी मांडलेले मुद्दे

सुमित बागुल
Wednesday, 16 September 2020

आज जे आम्ही भेटलो, त्यात दोन गोष्टींची चर्चा झाली. पुढील न्यायालयीन लढाई कशी करायची आणि जोवर ती लढाई जिंकत नाही तोवर मराठा समाजाला काय दिलासा द्यायचा.

मराठा आरक्षणासंदर्भात मुंबईत नुकतीच सर्वपक्षीय बैठक संपली आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीला महाराष्ट्र राज्याचे दोन्ही सभागृहांचे विरोधीपक्षनेते उपस्थित होते. बैठकीनंतर महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आणि विधानसभेचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला.

काय म्हणालेत उद्धव ठाकरे ?  

मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात याचिका केली होती. ती याचिका मोठ्या बेंच समोर जाण्यासाठी होती. सर्वोच्च न्यायालयाने ती याचिका मेनी केलीये. मात्र या कायद्याच्या अंमलबजावणीला न्यायालयाने अनपेक्षितपणे साल २०२०- २०२१ सालापुरती शैक्षणिक ऍडमिशनसाठी स्थगिती दिली आहे. त्यामुळे याबाबतचा संभ्रम निर्माण झालाय. आता दोन्ही सभागृहांचे विरोधीपक्षनेते आले होते. मागील काही दिवसात याचिका करणारे आणि त्यांचे वकील यांची देखील बैठक झाली. यासंदर्भात सरकारकडून समिती नेमली गेलेली आहेत.या समितीच्या माध्यमातून सर्व विधितज्ज्ञासोबत चर्चा सुरु आहे. याप्रकरणी आम्ही एक मार्ग, एक दिशा ठरवण्याच्या दिशेने आलेलो आहोत. विरोधीपक्षनेत्यांच्यासोबत झालेल्या बैठकीत मागील वेळी मी जेंव्हा फोन केला होता तेंव्हा त्यांनी मला जे वचन दिलं तेच त्यांनी आजही दिलंय. सर्व विरोधीपक्ष आमच्या सोबत सोबत आहे.  

आज जे आम्ही भेटलो, त्यात दोन गोष्टींची चर्चा झाली. पुढील न्यायालयीन लढाई कशी करायची आणि जोवर ती लढाई जिंकत नाही तोवर मराठा समाजाला काय दिलासा द्यायचा हा महत्त्वाचा मुद्दा होता. सरकार म्हणून आम्ही काही गोष्टी निश्चित केल्यात. सरकार आणि विरोधी पक्षाची जवळजवळ सारखीच भूमिका आहे. त्यामुळे या सर्व गोष्टी एकत्रित करून आम्ही उद्या किंवा परवा त्याबाबतचा निर्णय जाहीर करू. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात कसं जायचं याबद्दल सर्व बाबी तपासून विधिज्ञांशी बोलून सरकार पुढील पाऊल  टाकेल. 

सरकारकडे घटनापीठाकडे जाण्याचा पर्याय आहे का?

याबाबत बोलताना उद्धव ठाकरे म्हणालेत की, त्याबद्दल मी आता काही बोलणार नाही. याबाबतीत पुढे जाताना सर्व विधीतज्ज्ञांशी बोलून सर्व निर्णय घेत आहोत. मात्र यामध्ये एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, ज्यांनी उच्च न्यायालयात आपल्याला विजय मिळवून दिला, त्याच वकिलांची  टीम जशीच्या तशी, आणि त्यावेळच्या आर्ग्युमेण्टमध्ये कोणताही बदल केला गेलेला नाही. 

मराठा समाजाला आज माध्यमाद्वारे केलेल्या संवादातून उद्धव ठाकरे यांनी आंदोलन न करण्याची विनंती केली आहे. आंदोलन हे जेंव्हा सरकार आपल्या मागणीकडे लक्ष देत नसतं तेंव्हा केलं जातं. महाराष्ट्रातील एकही पक्ष या आरक्षणाविरोधात नाही. त्यामुळे कुणीही यासाठी आंदोलन करू नये, असं उद्धव ठाकरे म्हणालेत. दरम्यान, यासाठी आम्ही एक कालावधी ठरवलेला आहे आणि आम्ही त्याच्या जवळ आलेलो आहोत असंही उद्धव ठाकरे म्हणालेत.    

बैठकीनंतर काय म्हणालेत विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस : 

या बैठकीत विधानसभेचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधानपरिषद विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर हे उपस्थित होते. या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांसमोर विरोधीपक्षाची भूमिका मांडली आहे. आम्ही मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लागेल ते सर्व सहकार्य सरकारला करू असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यांनी विनंती करायची आणि घटनापीठ स्थापित करून त्यांच्यासमोर जायचं या भूमिकेत सरकार आहे. यासाठी आम्ही विरोधीपक्ष म्हणून भूमिका मांडताना आम्ही स्पष्टपणे सांगितलं की आम्ही मराठा समाजाच्या बाजूने आहोत. आम्ही यामध्ये कोणताही प्रकारचं राजकारण करणार नाही. मराठा समाजाला आरक्षण बहाल करण्यासाठी सरकार जे जे करेल त्याला आमचा पूर्ण पाठिंबा असेल. सरकार चुकत असेल तर सरकारला सांगू. मात्र याबाबद्दल सरकारला पाठिंबा देऊ, असं फडणवीस म्हणालेत.

मराठा तरुणाई समोरच्या भीतीचे वातावरण आहे. एकीकडे आरक्षण बहाल करत असताना मधल्या काळात सरकारने सारथीच्या माध्यमातून मराठा समाजातील तरुणांचं सबलीकरण केलं पाहिजे, अशीही भूमिका फडणवीसांनी घेतली. फडणवीसांनी देखील राज्यात कुणीही आंदोलन करू नये अशी सर्वांना विनंती केली आहे.     

all party meet for maratha reservation know full details of the meeting  
  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: all party meet for maratha reservation know full details of the meeting