esakal | बदलत्या हवामानाचा असाही परिणाम
sakal

बोलून बातमी शोधा

बदलत्या हवामानाचा असाही परिणाम

हवेतील वाढलेला गारवा, ढगाळ वातावरण, त्यातच ठाणे व काही भागात मध्यंतरी पावसाच्या हलक्‍या सरींनी लावलेली हजेरी या बदलत्या हवामानाचा परिणाम मानवी आरोग्यावर होत आहे. यात सर्दी-खोकल्याने पुन्हा डोके वर काढले आहे. ढगाळ आणि थंड वातावरणामुळे थंडीच्या दिवसात विषाणूंचा प्रसार वेगाने होत असतो. सध्याचे वातावरण विषाणूंच्या प्रसारास पोषक असून सर्दी, खोकल्याने नागरिक हैराण झाले आहेत. 

बदलत्या हवामानाचा असाही परिणाम

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

ठाणे : हवेतील वाढलेला गारवा, ढगाळ वातावरण, त्यातच ठाणे व काही भागात मध्यंतरी पावसाच्या हलक्‍या सरींनी लावलेली हजेरी या बदलत्या हवामानाचा परिणाम मानवी आरोग्यावर होत आहे. यात सर्दी-खोकल्याने पुन्हा डोके वर काढले आहे. ढगाळ आणि थंड वातावरणामुळे थंडीच्या दिवसात विषाणूंचा प्रसार वेगाने होत असतो. सध्याचे वातावरण विषाणूंच्या प्रसारास पोषक असून सर्दी, खोकल्याने नागरिक हैराण झाले आहेत. 

सकाळ-संध्याकाळ गार वारे सुटत असल्याने दिवसभर त्रास जाणवत नसला, तरी रात्रीच्या वेळेस रुग्णांना याचा जास्त त्रास होत असल्याची तक्रार रुग्ण करीत असल्याचे डॉ. श्रीकांत खांडगे यांनी सांगितले. दिवसभर वातानुकूलित कार्यालयात बसून काम करण्याचा शरीरावर प्रतिकूल परिणाम होत असून त्यामुळेही विषाणूजन्य आजारांचा प्रसार होत असल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले.

सर्दी-खोकल्याच्या रुग्णांची संख्या त्यातल्या त्यात जास्त असून हा आजार जास्त दिवस राहत असल्याचे डॉ. सुधीर वाधवा म्हणाले. हे आजार गंभीर नसले तरी याकडे दुर्लक्ष केल्याने याची लागण इतरांनाही होऊन रुग्णांमध्ये वाढ होत आहे. अनेक रुग्णांना दिवसभर सर्दी-खोकल्याचा त्रास होत नसला तरी सायंकाळी हा त्रास जाणवण्यास सुरुवात होत असल्याचे त्यांनी सांगितले. 

सायंकाळी हवेतील गारव्यात वाढ होत असल्याने कोरड्या खोकल्याची उबळ येते. लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक साथीच्या आजारांना लवकर बळी पडत आहेत. रुग्णांना घरात बसणे शक्‍य नसले तरी या दिवसांत शक्‍यतो प्रवास करताना योग्य ती काळजी घ्यावी; जेणेकरून इतरांना त्याची लागण होणार नाही. कोमट पाणी पिणे, उकळून गार केलेले पाणी पिणे, विश्रांती घेणे, सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळणे, बाहेरील खाद्यपदार्थ खाऊ नये, अशी काळजी रुग्णांनी घ्यावी.

सर्दी-खोकलाच असल्याने रुग्ण डॉक्‍टरांकडे जाण्यास टाळाटाळ करतात. परंतु केवळ घरगुती उपायांवर अवलंबून न राहता वैद्यकीय सल्लाही घ्या, असे डॉ. अरुण सावंत यांनी सांगितले. 

loading image