
अंबरनाथला : गुडघाभर पाण्यातून अंत्ययात्रा
अंबरनाथ : पावसाच्या पाण्यासह गटारातील सांडपाण्यातून वाट काढत अंत्ययात्रा काढण्याची वेळ बदलापूरमधील बेलवली परिसरातील रहिवाशांवर आली. रामचंद्र पाटील यांच्या पार्थिवावर मंगळवारी सकाळी पार्थिवावर बेलवलीतील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार होते. मात्र, बेलवली येथील स्मशानभूमीत जाण्यासाठी अंबरनाथ-बदलापूर रेल्वेमार्गाखालून भुयारी मार्गाची सोय आहे. मात्र, भुयारी मार्गात पाणी साचल्याने याशिवाय गटाराचे पाणीही कायम होते. त्यामुळे अंत्ययात्रा पाण्यातूनच काढण्यात आली.
बेलवली भागातून कात्रप आणि परिसरात जाण्यासाठी असलेले रेल्वे क्रॉसिंगवरील फाटक रेल्वेने बंद केले. याशिवाय त्याठिकाणी संरक्षक भिंत बांधण्यात आली आहे. त्यामुळे या ठिकाणी भुयारी मार्गाची सोय करण्यात आली. , मात्र या भुयारी मार्गात कायम बाजूच्या नाल्यातील पाणी असल्याने तसेच पावसाळ्यात पाणी साचत असल्याने भुयारी मार्गही बंद असतो. पर्यायी मार्ग त्वरित निर्माण करण्याची गरज किशोर पाटील यांनी व्यक्त केली.
भुयारी मार्गामधील साचलेले पाणी काढण्यासाठी असलेली पंपिंग यंत्रणा सक्षम करू, रेल्वे प्रशासनाशी चर्चा करून याबाबत कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी देखील प्रयत्न केले जातील, असे बदलापूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी योगेश गोडसे यांनी सांगितले.