कोरोना काळात आली गुडन्यूज, गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा पावसाळी आजार नियंत्रणात !

भाग्यश्री भुवड
Thursday, 15 October 2020

पावसाळ्यात उद्भवणारे मलेरिया, डेंग्यू, कावीळ, एच 1 एन 1 या आजारांवर नियंत्रण मिळवण्यात पालिका आरोग्य विभागाला यश आले आहे.

मुंबई : पावसाळ्यात उद्भवणारे मलेरिया, डेंग्यू, कावीळ, एच 1 एन 1 या आजारांवर नियंत्रण मिळवण्यात पालिका आरोग्य विभागाला यश आले आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात 536 मलेरियाचे रुग्ण आढळले होते. मात्र, यावर्षी 11 ऑक्टोबरपर्यंत 160 रुग्ण आढळल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा विविध आजारांची रुग्ण संख्या कमी झाल्याचे आरोग्य विभागातील अधिकाऱ्याने सांगितले. 

पावसाळ्यात मलेरिया, डेंग्यू, लेप्टो, गॅस्ट्रो, हिवताप, कावीळ असे विविध आजार पसरतात. यंदा कोरोनाचे संकट ओढावल्याने पावसाळी आजारांना रोखणे आरोग्य विभागासमोर मोठे आव्हान  होते. मात्र, कोरोना पाठोपाठ पावसाळी आजारांवर नियंत्रण मिळवण्यात आरोग्य विभागाला यश आले आहे. मार्च महिन्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. जुन महिन्यात पावसाचे आगमन होते. त्यामुळे, कोरोनावर नियंत्रण मिळवतानाच पावसाळी आजार रोखण्याचेही आव्हान पालिकेच्या आरोग्य विभागासमोर होते. मात्र, कोरोना नियंत्रणात ठेवत साथीच्या आजारांना रोखण्यात यश आले आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाकडून पावसाळी आजार रोखण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांना चांगलेच यश येऊ लागले आहे. 

महत्त्वाची बातमी : सिनेमागृह कधी सुरु होणार? मल्टिप्लेक्स मालकांसोबतच्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी दिलं उत्तर

यामध्ये मुंबईभरात जंतूनाशक फवारणी, डास प्रतिबंधक फवारणी करणे, घरोघरी जाऊन तपासणी करणे, डास उत्पन्न करणारी लाखो ठिकाणे नष्ट करणे, स्वच्छता उपक्रम, नागरिकांमध्ये पावसाळी आणि साथीचे आजार रोखण्यासाठी आवश्यक जनजागृती करणे यामुळे चांगलेच यश आले असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात लेप्टोचा 1 आणि  डेंग्यूमुळे दोन जणांना जीव गमावला लागला होता. 

गेल्या वर्षीच्या तुलनेतही ऑक्टोबर महिन्यात रुग्णसंख्या कमीच

आजार         वर्ष 2019           वर्ष 2020

  • मलेरिया          536                      160
  • लेप्टो                 30                        15
  • डेंग्यू               242                          1
  • गॅस्ट्रो              386                        31
  • हिपेटायटिस      70                           3
  • H1N1               4                           0

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: amid corona count of monsoon related viral decides dropped in mumbai