छः महीने दिए हैं, बनाओ भाई सरकार!; अमित शहांचे उघड आव्हान

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 14 November 2019

कोणाची संधी हिसकावली, कशी हिसकावली, असे रागाने विचारून शहा म्हणाले, की राज्यपालांना राजकीय वादात ओढणे योग्य नाही व त्यांनी पुरेशी वेळ दिली नव्हती, असे म्हणणेही योग्य नाही. विधानसभेची मुदत संपली तेव्हाच राज्यपालांनी सर्व पक्षांना बोलावले. कोणाकडे सरकार स्थापनेएवढे संख्याबळ असेल तर ते आजही सरकार बनवू शकतात. तिघांकडेही संधी आहे.

नवी दिल्ली : महाराष्ट्रात सत्तास्थापनेचा दावा भाजपने सोडून दिल्यावर राज्यपालांनी सर्वांना सरकार स्थापनेसाठी योग्य वेळ दिला होता व निकालानंतर 18 दिवसांत सध्याच्या तिघांपैकी एकाही पक्षाने सरकार स्थापनेसाठी दावा केलेला नव्हता, असा पलटवार भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी केला. "राज्यपालांनी राज्यात सरकार बनविण्यासाठी सहा महिने दिले आहेत. तुम्ही बनवा ना सरकार,' असे उघड आव्हान त्यांनी शिवसेनेसह तीनही इच्छुक पक्षांना दिले. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

शहा यांनी एका खासगी वाहिनीशी बोलताना, राज्यात युतीने निवडणूक जिंकली, तर देवेंद्र फडणवीस यांच्याच नेतृत्वाखाली सरकार बनेल, असे स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीररीत्या सांगितले होते, असे सांगून त्यांनी शिवसेनेच्या मुख्यमंत्रिपदाच्या मागणीला नाही, असे प्रत्युत्तर दिले. 24 ऑक्‍टोबरनंतर राज्यात राजकीय संकट निर्माण झाल्यापासून बाळगलेले गूढ मौन शहा यांनी आज तोडले. शिवसेनेला दिलेला शब्द भाजपने तोडल्याने अभूतपूर्व घटनात्मक संकट निर्माण झाल्याचा आरोप त्यांनी फेटाळला. सरकार स्थापनेचा दावा करणाऱ्या सर्वच पक्षांना योग्य वेळ दिला गेल्याचा दावा त्यांनी केला. शिवसेनेच्या मागण्या भाजपला मान्य नाहीत, असे शहा स्पष्ट म्हणाले. पंतप्रधानांनी जेव्हा फडणवीस हेच राज्याचे पुढचे मुख्यमंत्री असतील, असे सांगितले तेव्हा कोणी त्याचा विरोध केला नाही. आता ते (शिवसेना) नव्या मागणीसह समोर आले व ती भाजपला मान्य नाही, अशी पुस्ती त्यांनी जोडली. 

कोणाची संधी हिसकावली, कशी हिसकावली, असे रागाने विचारून शहा म्हणाले, की राज्यपालांना राजकीय वादात ओढणे योग्य नाही व त्यांनी पुरेशी वेळ दिली नव्हती, असे म्हणणेही योग्य नाही. विधानसभेची मुदत संपली तेव्हाच राज्यपालांनी सर्व पक्षांना बोलावले. कोणाकडे सरकार स्थापनेएवढे संख्याबळ असेल तर ते आजही सरकार बनवू शकतात. तिघांकडेही संधी आहे. ते एकत्रपणे राज्यपालांकडे जाऊ शकतात. यात संधी देण्याचा विषय येतो कोठे? विरोधी पक्ष या मुद्द्यावर निव्वळ राजकारण करत आहेत. राज्यपालांनी सर्वांना सहा महिने संधी दिली आहे. बनवा ना सरकार. कपिल सिब्बलांसारखे वकील बालिश युक्तिवाद करत फिरत आहेत. भाजप आजही राज्यातील सर्वांत मोठा पक्ष आहे, असे शहा म्हणाले. 

 

ते माझ्या संस्कारांत नाही... 

बंद दरवाजाआड दोन नेत्यांमध्ये झालेले बोलणे वा चर्चा चव्हाट्यावर मांडणे माझ्या पक्षाच्या संस्कारात बसत नाही, असा टोला उद्धव ठाकरे यांना लगावून शहा म्हणाले, की राज्यपालांनी राष्ट्रपती राजवटीची शिफारस केल्याने भाजपचे काळजीवाहू सरकारही गेले व आमच्याच पक्षाचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. आम्ही शिवसेनेला बरोबर घेऊन सरकार बनविण्यास तयार होतो; पण त्यांच्या नव्या मागण्या आम्हाला मान्य नाहीत. योग्यवेळी पक्षपातळीवर याचा विचारविनिमय केला जाईल. आम्ही कोणाचाही विश्‍वासघात केलेला नाही. Webtitle : Amit shah on shiv sena and Maharashtra presidents rule in Maharashtra


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: amit shah on nshivsena and maharashtras presidents rule in maharashtra