अमित ठाकरेंचं उपमुख्यमंत्र्यांना पत्र, पत्रात केली 'ही' मागणी

सकाळ वृत्तसेवा 
Monday, 22 June 2020

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना लिहिलं आहे. आशा स्वयंसेविकांचा मासिक मोबदला वाढवून द्यावा, अशी मागणी अमित ठाकरे यांनी पत्राद्वारे केली आहे.

 

मुंबई- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपूत्र आणि मनसे नेते अमित ठाकरे यांनी  उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना लिहिलं आहे. आशा स्वयंसेविकांचा मासिक मोबदला वाढवून द्यावा, अशी मागणी अमित ठाकरे यांनी पत्राद्वारे केली आहे. तसंच अमित ठाकरे आज दुपारी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचीही भेट घेणार असल्याचं समजतंय. अमित ठाकरे यांनी फेसबुकवर हे पत्र शेअर केले आहे. 

फेसबुक पोस्टमध्ये अमित ठाकरेंनी लिहिलं की, परवा काही 'आशा' स्वयंसेविका मला भेटायला आल्या होत्या. आरोग्य सेवेच्या कामाचा मोबदला म्हणून त्यांना महिन्याला फक्त रु. 1600 मानधन मिळत असल्याचं त्यांनी सांगितलं. महाराष्ट्रात अशी स्थिती असताना इतर राज्यांत मात्र 'आशां'ना दर महिन्याला रु. 4,000 ते 10,000 इतका मोबदला मिळत आहे. आपल्या सर्वांच्या आरोग्यासाठी या स्वयंसेविका 'आरोग्य सैनिक' बनून, अनेकदा स्वत:चा जीव धोक्यात घालून काम करत असतात. विशेषत: कोविड संकटकाळात त्यांनी केलेलं काम कौतुकास्पद आहे. कामाचा मासिक मोबदला वाढवून मिळावा, ही त्यांची मागणी रास्त आहे. त्यांना ताठ मानेने आयुष्य जगता यावं, यासाठी त्यांना मिळणारा मोबदला त्वरित वाढवून देण्याबाबत उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार आणि आरोग्यमंत्री श्री. राजेश टोपे यांना पत्र लिहिलं.

आशा स्वयंसेविकांच्या मानधनाचा निर्णय घेताना तो महापालिका स्तरावर न घेता संपूर्ण राज्याच्या पातळीवर घ्यावा, म्हणजे विषमता निर्माण होणार नाही, अशी मागणीही अमित ठाकरे यांनी पत्रातून केली आहे. 

कोरोना व्हायरसच्या संकट काळात अमित ठाकरेंनी बऱ्याचंदा राज्य सरकारशी पत्रव्यवहार केला आहे. यात त्यांनी केलेल्या अनेक मागण्या मान्य केल्या. बंधपत्रित (बॉण्डेड) डॉक्टर्सच्या मानधनात मोठी वाढ करण्याचा (Enhance Pay Of Doctors On Contract) तसंच कंत्राटी डॉक्टर्सचे आणि त्यांचे मानधन समान करण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला. अमित ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून तसेच आरोग्य मंत्र्यांची भेट घेऊन डॉक्टरांच्या मानधनात वाढ करण्याची मागणी केली होती.  

याव्यतिरिक्त अमित ठाकरेंच्या मागणीनंतर कंत्राटी डॉक्टर्सचे आणि त्यांचे मानधन समान करण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला. पुण्यात अडकलेल्या एमपीएससी आणि इतर स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांचा प्रश्न अमित ठाकरे यांनी मांडल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी अवघ्या बारा तासात आपला शब्द पाळत त्यांना आपल्या घरी पोहोचवण्यासाठी व्यवस्था केली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Amit Thackeray's letter to the Deputy Chief Minister