पनवेलमधील `त्या` पिसाळलेल्या कुत्र्याचा मृत्यू 

पिसाळलेला कुत्रा
पिसाळलेला कुत्रा

पनवेल : पनवेल शहरात दहशत निर्माण करणाऱ्या भटक्‍या श्वानाचा अखेर मृत्यू झाल्याची माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला असला तरी पिसाळलेल्या श्वानाच्या संपर्कात शहरातील इतर भटके श्वान आल्याची शक्‍यता आहे. त्यामुळे अशा रेबीजग्रस्त  श्वानांचा शोध घेऊन, तत्काळ उपाययोजना करण्यात पालिका हतबल झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे त्या कुत्र्याचा मृत्यू झाला तरी पनवेलमध्ये पिसाळलेल्या कुत्र्यांची दहशत कायम आहे. 

दोन दिवसांपूर्वी घडलेल्या भयंकर घटनेमुळे जाग्या झालेल्या पालिकेने बंद असलेले निर्बीजीकरण केंद्र सुरू करण्याकरता प्राप्त झालेल्या एकमेव निविदाधारकास सोमवारपासून प्रत्यक्षात काम सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रशांत रसाळ यांनी दिली आहे. ऐन दिवाळीत पनवेल शहरात रेबीज झालेल्या भटक्‍या श्वानाने दहशत पसरवत दोन दिवसांत जवळपास 30 ते 35 नागरिकांचे लचके तोडले होते. भटक्‍या श्वानांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या नागरिकांवर शहरातील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले; मात्र याच काळात बिथरलेल्या या श्वानाने परिसरातील इतर भटक्‍या श्वानांवरही हल्ला केल्याची शक्‍यता आहे. हल्लेखोर श्वानास रेबीज झाल्याची शक्‍यता पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी वर्तवली असून, रेबीज रोगाची लागण झालेल्या श्वानाने हल्ला केलेल्या व्यक्ती अथवा प्राण्यांवर वेळीच उपचार न झाल्यास हल्ला झालेल्या प्राणी-व्यक्तींनाही रेबीजची लागण होण्याची शक्‍यता असते. त्यामुळे पालिकेच्या वतीने सोमवारपासून श्वान निर्बीजीकरण केंद्र सुरू करण्याचे निर्देश निविदाप्राप्त संस्थेला देण्यात आले आहेत. 

स्थायी सभेत अंतिम मंजुरी 
काही महिन्यांपासून बंद असलेले पालिकेचे निर्बीजीकरण केंद्र पुन्हा सुरू करण्यासाठी पालिकेमार्फत निविदा प्रक्रिया राबवली गेली. मागील महिन्यात झालेल्या स्थायी समिती सभेत पालिकेला प्राप्त झालेल्या निविदेला मंजुरी मिळणे अपेक्षित होते; मात्र निविदेतील जादा दरामुळे मान्यता देण्याचा प्रस्ताव स्थगित ठेवण्यात आला होता. आता मात्र निविदा दिलेल्या संस्थेने दरात फरक करण्यास मंजुरी दिल्याने 2 तारखेच्या स्थायी सभेत निर्बीजीकरणासाठी दाखल निविदेला मंजुरी मिळण्याची शक्‍यता आहे. 

निर्बीजीकरण बाबींवर दृष्टिक्षेप
संस्थेकडून प्राप्त झालेले दर- 1680 
चर्चेअंती मान्यता देण्यात आलेले दर- 1360 
वर्षाला निर्बीजीकरण होणाऱ्या श्वानांची संख्या- 3,000  

प्राथमिक आरोग्य केंद्रात लस उपलब्ध 
पालिकेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात श्वानदंशावर लस उपलब्ध झाल्या आहेत. `हाफकिन`कडून 1290 लसींचा पुरवठा पालिकेच्या आरोग्य विभागाला करण्यात आला असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. 

आठवडाभरात 87 जणांना श्वानदंश 
मागील आठवडाभरात श्वानदंश झालेल्या 87 रुग्णांवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले, अशी माहिती रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी दिली आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com