वाशीतल्या मनपा रुग्णालायत येणाऱ्या रुग्णांची अँटीजन टेस्ट, नियोजन नसल्याने रुग्ण त्रस्त

शुभांगी पाटील - गुरव
Friday, 1 January 2021

वाशी येथील प्रथम संदर्भ रुग्णालायत येणाऱ्या रुग्ण आणि त्यांच्या बरोबर असणाऱ्या नातेवाईकांची रुग्णालयात प्रवेश करतानाच अँटीजन टेस्ट करण्यात येत आहे.

मुंबईः नवी मुंबई महानगरपालिकेकडून आजपर्यंत कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून विविध उपाययोजना राबविल्या गेल्या आहेत. त्यात मनपा प्रशासनाला यश देखील येत आहे. मात्र आता नव्याने वाशी येथील प्रथम संदर्भ रुग्णालायत येणाऱ्या रुग्ण आणि त्यांच्या बरोबर असणाऱ्या नातेवाईकांची रुग्णालयात प्रवेश करतानाच अँटीजन टेस्ट गेल्या दोन दिवसापासून करण्यात येत आहे. हा उपक्रम चांगला आहे. पण अँटीजन चाचणी करताना नियोजनाचा अभाव आणि जनजागृती मनपा प्रशासनाकडून न केल्याने रुग्णालयात उपचारासाठी जाणाऱ्या नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान ऐरोली आणि नेरुळ येथील रुग्णालयात ही व्यवस्था न केल्याने नागरिक आश्चर्य व्यक्त करत आहेत.

ब्रिटन येथे सापडलेल्या कोरोना विषाणूमुळे प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. म्हणून मनपा आरोग्य प्रशासनाकडून मंगळवारपासून दवाखान्यात प्रवेश करतानाच रुग्ण आणि नातेवाईक यांची अँटीजन चाचणी केली जाते. मात्र या ठिकाणी नागरिकांना बसण्यासाठी कोणतीही व्यवस्था नाही. त्यामुळे नागरिकांना उभे राहूनच तास दीड तास उभे राहावे लागत आहे. या रांगेत कमीत कमी 100 ते 150 रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक असतात. तसेच रुग्णालयच्या प्रवेशद्वारावर अँटीजन टेस्ट संबंधी काहीही माहिती प्रसिद्ध केली नसल्याने नागरिकांना संभ्रम पडत आहे.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

रुग्णालयात लहान मूल, वयोवृद्ध नागरिक, गरोदर माता या विविध प्रकारचे रुग्ण येत असतात. त्यांना या अँटीजन टेस्ट करताना मोठा फटका बसत आहे.  अँटीजन टेस्ट करताना रांगेत उभे राहून पुन्हा केस पेपर काढण्यासाठी देखील रांगेत उभे राहावे लागत असल्याने नागरिकांना चांगलाच त्रास होत असल्याचे किरण पवार यांनी सांगितले. मनपा कडून सुरू केलेला उपक्रम चांगला आहे. पण नियोजनचा अभाव असल्याने भयंकर त्रास होत आहे असेही त्यांनी सांगितले.
 
ऐरोली आणि नेरुळ येथे देखील मनपाची रुग्णालये आहेत. याठिकाणी सुद्धा रुग्ण आणि नातेवाईकांची मोठी गर्दी असते. पण ज्या प्रकारे वाशी मनपा रुग्णालयात अँटिजेन टेस्ट केली जाते. त्या प्रकारे केली जात नाही. त्यामुळे ऐरोली आणि नेरुळ परिसरात कोरोनाचा संसर्ग नाही का?असा सवाल उपस्थित होत आहे. 

हेही वाचा- कोरोनातून बरे होण्यासाठी 55 दिवस ICUमध्ये राहिलेल्या व्यक्तीवर यशस्वी उपचार

मी माझ्या 72 वर्षीय आईला मणक्याच्या त्रास होत आहे म्हणून रुग्णालयात घेऊन गेलो होतो. पण अचानक आम्हला अँटीजन टेस्ट करण्यास सांगितले. यामुळे माझ्या आईला खूप त्रास झाला. जर आधीच जनजागृती केली असती तर किमान मानसिक बळ घेऊन गेलो असतो.
किरण पवार, रुग्णाचे नातेवाईक, घणसोली 

जर वयोवृद्ध, गरोदर महिला, लहान बालके यांना त्रास होत असेल तर त्यांना प्रथम प्राधान्य दिले जाईल. तसेच ऐरोली आणि नेरुळ येथील रुग्णालयात सुद्धा लवकरच अँटीजन टेस्ट सुविधा सुरू करण्यात येईल.
डॉ.अजय गडदे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, मनपा

----------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Antigen test patients coming Vashi Municipal Hospital patients suffer due  lack planning


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Antigen test patients coming Vashi Municipal Hospital patients suffer due lack planning