पनवेलमध्ये शेवंतीचा सुगंध महागला

सकाळ वृत्‍तसेवा
मंगळवार, 1 ऑक्टोबर 2019

नवरात्रोत्सवासाठी मागणी;  झेंडूचा भाव उतरला, पुण्यातील पुराचा फटका 

पनवेल : गणेशोत्सवानंतर अगदी आतुरतेने वाट पाहिली जाते ती म्हणजे नवरात्रोत्सवाची. यंदा नवरात्रोत्सवास रविवार पासून सुरुवात झाली. उत्सवासाठी बाजारपेठा सजल्या आहेत. साहित्य खरेदी करण्यासाठी भक्त बाजारपेठांमध्ये गर्दी करीत आहेत; मात्र गेल्या काही दिवसांच्या तुलनेत शेवंतीचे दर वाढले असल्याने फुलांचा सुगंध महागला असल्याचे दिसून येत आहे. तर पुण्यातील पुराचा फटका झेंडुला बसला असून झेंडुचा दर निम्‍यावर आला आहे. 

सध्या बाजारपेठेत नारळासह केळीची पाने, फळे यासह करंडा, हिरव्या रंगाच्या बांगड्या, सुपारी, हळदी-कुंकू, खारीक, खोबरे आदी देवीच्या ओटीचे साहित्य, टोपली, मडकी, मिक्‍स भाजी, कंदाफणी, देवीचा शृंगार, गुलाल, बुक्का दोऱ्याचे बंडल, कापसाचे वस्त्र आणि वाती, तसेच सात प्रकारच्या धान्याच्या पुड्या या पूजा साहित्यासह रांगोळी सजावट बाजारात नवरात्रोत्सवासाठी उपलब्ध असल्याचे विक्रेत्या रुपाली पाटील यांनी सांगितले.

गुलछडी, जास्‍वंदीची चलती 
घटस्थापनेच्या निमित्ताने फुलांची मागणी वाढली आहे. विशेषतः झेंडू, गुलछडी, शेवंती, जास्वद यांना मागणी आहे. पुण्यात झालेल्या पुराचा परिणाम फुलांच्या किमतीवर झाला असून भाव वाढले असल्याचे फूल विक्रेत्यांचे म्हणणे आहे. एक-दोन दिवसांत आणखी भाव वाढणार असल्याचे फूल विक्रेते अनिल राजभर यांनी सांगितले.

यंदा देवीला लागणाऱ्या साहित्याचे भाव काहीसे वाढले आहेत. ग्राहकांचा प्रतिसाद ठीकठाक आहे. येत्या दोन दिवसांत प्रतिसाद चांगला असेल.
- नूतन पाटील, श्री समर्थ कृपा अगरबत्ती. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The aroma of the scent was expensive in Panvel