गणेशोत्सवात फळांची आवक वाढली

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 सप्टेंबर 2019

गणेशोत्सव सुरू झाल्यापासून फळांची मागणी वाढली आहे. मात्र पाऊस असल्याने खरेदीदार व विक्रेत्यांना बाजारात पोहोचण्यास अडचणी येत आहेत. 

नवी मुंबई : गणेशोत्सव सुरू झाल्यापासून फळांची मागणी वाढली असून, घाऊक फळबाजारात देखील फळांची आवक वाढली आहे; मात्र पाऊस असल्याने खरेदीदार व विक्रेत्यांना बाजारात पोहोचण्यास अडचणी येत आहेत. 

काश्‍मीर हिमाचलमधून सफरचंद आणि पीअरही मोठ्या बाजारात येत आहेत; मात्र पाऊस असल्याने माल बाजारात पोहोचण्यास अडचणी येत आहेत. भारतीय सफरचंदांचा हंगाम सुरू असल्याने, हिमाचल प्रदेशमधून बाजारात मोठ्या प्रमाणात सफरचंद येत आहेत. बाजारात दररोज सफरचंदाच्या ५० ते ६० गाड्या येत आहेत. त्यामुळे सफरचंदाचे दरही अवाक्‍यात आहेत. घाऊक बाजारात अगदी ५० रुपये किलोपासून, १०० रुपये किलोपर्यंत सफरचंद उपलब्ध आहेत. त्यामुळे ग्राहकांना मोठ्या प्रमाणात सफरचंदाचा आस्वाद घेता येत आहे. याशिवाय काश्‍मीरमधून मोठ्या प्रमाणात पीअरही बाजारात दाखल होत आहेत. बाजारात दररोज पीअरच्या दहा गाड्या येत आहेत. त्यामुळे घाऊक बाजारात पीअरचे दर ६० ते १०० रुपये किलोच्या घरात आहेत. त्याचप्रमाणे आता डाळिंब, सीताफळ, संत्री, मोसंबीची आवक वाढली आहे. पपईच्याही दहा ते पंधरा गाड्या येत आहेत. 

गणेशोत्सव असल्याने फळांना मागणी आहे. गणपतीच्या दर्शनासाठी जाताना गणेशभक्त फळांची आवर्जून खरेदी करतात. त्यामुळे या दिवसांत फळांना मागणी वाढली असून, व्यापारीही मोठ्या प्रमाणात फळे मागवून ठेवतात. राज्याच्या विविध भागांतून इतर फळांचीही आवक सुरू आहे. चिकू, पेरू, टरबूज थोड्या-फार प्रमाणात पाहायला मिळत आहेत. 

संततधार सुरू असणाऱ्या पावसामुळे किरकोळ खरेदीदारांना बाजारापर्यंत येता येत नाही; तर आता पावसाने उसंत घेतल्यावर खरेदीदार बाजारात येऊ लागले. फळांना मागणी जास्त असली तरी दर मात्र स्थिर आहेत. 
- आनंदा बोजहाडे, फळ व्यापारी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The arrival of fruits increased during Ganeshotsav