रोहित पक्ष्यांचे आगमन उशिराने

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 डिसेंबर 2019

रोहित पक्ष्यांसाठी प्रसिद्ध असलेला नवी मुंबईचा खाडी किनारा सध्या या पक्ष्यांच्या प्रतीक्षेत आहे. लांबणीवर पडलेला परतीचा पाऊस, बदललेले हवामान अशा विविध कारणांमुळे हे प्रवासी पक्षी नवी मुंबईच्या खाडीकिनारी डिसेंबर मध्यावर येण्यास सुरुवात झाली आहे.

नवी मुंबई : रोहित पक्ष्यांसाठी प्रसिद्ध असलेला नवी मुंबईचा खाडी किनारा सध्या या पक्ष्यांच्या प्रतीक्षेत आहे. लांबणीवर पडलेला परतीचा पाऊस, बदललेले हवामान अशा विविध कारणांमुळे हे प्रवासी पक्षी नवी मुंबईच्या खाडीकिनारी डिसेंबर मध्यावर येण्यास सुरुवात झाली आहे. ऐरोलीच्या रोहित अभयारण्यात सध्या 25 हजार पक्षी मुक्कामाला आले आहेत, अशी माहिती येथील जैवविविधता केंद्राचे अधिकारी एन. जी. कोकरे यांनी दिली. 

थंडीची चाहूल लागली की ऑक्‍टोबर, नोव्हेंबरच्या कालावधीत हे पक्षी जलाशयावर विणीच्या हंगामासाठी दाखल होत असतात. मार्च-एप्रिलपर्यंत त्यांचे या ठिकाणी वास्तव्य असते. त्यानंतर ते आपल्या मायदेशी परततात. लालबुंद चोच, गुलाबी पंख, लांबसडक मान, उंच असणारे पाय असे त्यांचे लोभस रूप असल्यामुळे त्यांना "अग्निपंख' असेही संबोधले जाते. उरण, शिवडी, नेरूळ, वाशी, मानखुर्द, घणसोली, ऐरोली या खाडीकिनारी कांदळवनांच्या शेजारी थव्याने हे पक्षी विहार करू लागतात. कांदळवनांच्या मुळांच्या जवळ मासे, शेवाळ, खेकडे हे या पक्ष्यांचे खाद्य आहे. त्यामुळे कांदळवनांच्या जवळच घरटी करून हे पक्षी राहत असतात, परंतु गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा हे पक्षी उशिराने या ठिकाणी आले असून, मागील दोन दिवसांपासून ते खाडी किनारी दिसू लागले आहेत. 

खाडी किनाऱ्याच्या गाळात शेवाळ मुबलक प्रमाणात असल्यामुळे शेवाळ खाद्य असणाऱ्या या पक्ष्यांना येथील वातावरण पोषक ठरते. जिथे खाडी उथळ व गाळ जास्त अशा ऐरोली, वाशी, नेरूळ, सीवूड इत्यादी खाडींवर त्यांचे हमखास वास्तव्य आढळून येते. जूनची सुरुवात झाली की हे प्रवासी पक्षी पुन्हा परतीच्या प्रवासाला सुरुवात करतात, परंतु सध्या हे पक्षी नवी मुंबईच्या खाडी किनारी येण्यास सुरुवात झाल्यामुळे रोहित पक्ष्यांच्या सुंदर कवायती पाहायला मिळतील या अपेक्षेने नवी मुंबई व शेजारच्या परिसरातील पक्षीप्रेमींचे, छायाचित्रकारांचे पाय खाडीकिनाऱ्याच्या दिशेने पडू लागल्याचे चित्र आहे. आपल्याकडील हिवाळ्यात सायबेरिया व कच्छवरून येणारे हे रोहित पक्षी थव्याथव्याने येत असतात. 

हे पक्षी सध्या दिसतात 
युरोप, अफ्रिका, आशियात आढळणारा कॉमन रेडशान्क (सामान्य टिलवा), आयर्लंड येथे आढळणारा ब्लॅक टाईल्ड गॉडविट (शेपटीचा पाणटिळवा), इंग्लड व युरोपियन देशात आढळणारा युरेशियन कुरव, युरोप, मध्य व पश्‍चिम आशिया, अफ्रिका व दक्षिण आशिया दिसणारा पेड एव्होसेट (उचाट्या), अंटार्क्‍टिका सोडून सर्व खंडांमध्ये सामान्यपणे आढळणारा व घारीप्रमाणे दिसणारा ओसप्रे (कैकर), उत्तर युरोप, उत्तर अमेरिका, आशियामध्ये दिसणारा नॉर्थ शॉवेलर (थापट्या) आदी प्रवाशी पक्षी सध्या खाडीकिनारी येण्यास सुरुवात झाली आहे. 

या वर्षी हवामानात विविध बदल झाल्यामुळे या प्रवासी पक्ष्यांचे आगमन थोडे उशिराने झाले आहे. पावसाळा अधिक काळ थांबला. अजून थंडी पडण्यास सुरुवात नाही; मात्र फेब्रुवारीपर्यंत सर्व प्रजातीचे पक्षी येतील. 
- दीपक आपटे, बीएचएनएस, संचालक. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The arrival of the Rohit birds has been delayed