ठाकरे-शिंदे राम-श्यामची जोडी ते कधीही एकत्र येऊ शकतात; ठाण्यात औवैसींचा हल्लाबोल : Owaisi on Thackeray | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Uddhav Thackeray,Asaduddin Owaisi

Owaisi on Thackeray: ठाकरे-शिंदे राम-श्यामची जोडी ते कधीही एकत्र येऊ शकतात; ठाण्यात औवैसींचा हल्लाबोल

ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे हे राम-श्यामची जोडी आहेत, ते कधीही एकत्र येऊ शकतात अशा शब्दांत असदुद्दीन ओवैसी यांनी त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे. ठाण्यातील मुब्र्यात जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी अजित पवार, सुप्रिया सुळे तसेच फडणवीस यांच्यावरही सडकून टीका केली. (Asduddin Owaisi slams on Uddhav Thackeray and Eknath Shinde at Thane Mumbra rally)

औवेसी म्हणाले, "शिवसेनेचे दोन तुकडे झाले तर मला मीडियावाल्यांनी विचारलं की, तुम्हाला उद्धव ठाकरेंबद्दल सहानुभूती वाटत नाही का? पण मला मीडियावाल्यांना विचारायचं आहे की, जेव्हा मुंबईच्या रस्त्यांवर कत्तली होत होत्या तेव्हा त्यांना सहानुभूती वाटली नाही. जेव्हा टाडाच्या कायद्यांतर्गत लोकांना तुरुंगात टाकलं गेलं तेव्हा त्यांना सहानुभूती वाटली नाही. हे तुम्ही विसरलात का? मी कधीही विसरणार नाही"

हे लोक आता म्हणत आहेत की, धर्मनिरपेक्षता वाचवा. आपल्याकडं कोणती धर्मनिरपेक्षता राहिलीए सांगा मला. शिवसेना धर्मनिरपेक्ष आहे? शिवसेना कधीपासून धर्मनिरपेक्ष झाली. राहुल गांधी ओरडून सांगतील का, की शिवसेना धर्मनिरपेक्ष झाली. दोघेही शिंदे आणि ठाकरे यांची राम आणि श्यामची जोडी आहेत, हे कधीही एकत्र येऊ शकतात, अशा शब्दांत औवेसी यांनी दोघांवर हल्लाबोल केला.

औवेसी पुढे म्हणाले, जेव्हा राष्ट्रवादीचे अजित पवार, सुप्रिया सुळे नेते होऊ शकतात. उद्धव ठाकरे केवळ आपल्या वडिलांच्या पुण्याईवर नेता होऊ शकतात. तसेच एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस नेते होऊ शकतात. मग महाराष्ट्रातील मुस्लिम व्यक्ती शरद पवार, उद्धव ठाकरे आणि शिंदे यांच्यासारखे होऊ शकत नाहीत का? केवळ घोषणाबाजी करून तुम्ही एक होऊ शकत नाही. संघटित व्हा, मतदान करा आणि नेते व्हा. जेव्हा तुमची चर्चा होईल, तेव्हा तुम्ही त्यांच्याशी बरोबरी करु शकाल अशा शब्दांत त्यांनी मुस्लीम समुदयाला एकत्र येण्याचं आवाहन केलं.