esakal | अशोक चव्हाण यांना हटवा; मराठा आंदोलकांच्या बैठकीत मागणी
sakal

बोलून बातमी शोधा

अशोक चव्हाण यांना हटवा; मराठा आंदोलकांच्या बैठकीत मागणी

मराठा आरक्षण तसेच मराठा समाजाच्या मागण्यांकडे सरकारने केलेले अक्षम्य दुर्लक्ष व नाकर्तेपणाच्या भूमिकेवर आज मराठा आंदोलकांच्या समन्वयकांनी जोरदार हल्ला चढविला.

अशोक चव्हाण यांना हटवा; मराठा आंदोलकांच्या बैठकीत मागणी

sakal_logo
By
कृष्ण जोशी

मुंबई  ः मराठा आरक्षण तसेच मराठा समाजाच्या मागण्यांकडे सरकारने केलेले अक्षम्य दुर्लक्ष व नाकर्तेपणाच्या भूमिकेवर आज मराठा आंदोलकांच्या समन्वयकांनी जोरदार हल्ला चढविला. सरकारने 31 डिसेंबरपर्यंत निर्णायक पावले न उचलल्यास यासाठी पुन्हा एकदा मोठे आंदोलन उभारावे तसेच अशोक चव्हाण यांना उपसमितीवरून हटविण्यात यावे, असे आग्रही प्रतिपादनही आज करण्यात आले. 

मुंबई परिसरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

वडाळा क्रीडा संकुलात आज विविध मराठा संघटनांची ही राज्यव्यापी बैठक झाली. सकल मराठा समाज, मराठा क्रांती मोर्चा, मराठा क्रांती ठोक मोर्चा, समस्त मराठा समाज आदींचे समन्वयक यावेळी हजर होते. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला दिलेली स्थगिती, त्यामुळे निवड होऊनही मराठा तरुणांना न मिळालेल्या नोकऱ्या, रखडलेले शैक्षणिक प्रवेश, सरकारची भूमिका व त्यानुसार यापुढे समाजाने करावयाचे आंदोलन आदी विषयांवर आज चर्चा करण्यात आली. 

मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगितीमुळे निर्माण झालेल्या प्रश्नांवर प्रामुख्याने चर्चा झाली. मुळात सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण टिकविण्यात राज्य सरकारला आलेले अपयश, सरकारची नाकर्तेपणाची भूमिका व मराठा समाजाच्या मागण्यांकडे चालवलेले अक्षम्य दुर्लक्ष यावर अनेक समन्वयकांनी टीका करून मोठे आंदोलन करावे, अशी भूमिका मांडली.

मराठा समाजाच्या सर्व प्रश्नांवर निर्णय घेण्यासाठी सरकारला 31 डिसेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली. या वेळेत सरकारने निर्णय घेतला नाही तर 3 जानेवारी रोजी बैठकीत पुढील मोठ्या आंदोलनाची दिशा ठरविली जाईल, असेही आज निश्चित झाले. 

मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेस स्वबळावर लढण्याच्या भूमिकेवर ठाम

अशोक चव्हाण यांना हटवा 
...........................................
अशोक चव्हाण यांच्या निष्काळजीपणामुळे मराठा आरक्षणावर स्थगिती आल्याचे ताशेरेही आज झोडण्यात आले. त्यामुळे मराठा आरक्षण कायदा  वाचविण्यासाठी अशोक चव्हाण यांना उपसमिती वरून हटवावे. त्यांच्या जागी अजितदादा पवार, एकनाथ शिंदे किंवा जयंत पाटील यांच्याकडे ही जबाबदारी सोपवावी, असा ठराव संमत करण्यात आला.

न्यायालयात मराठा आरक्षणावर अंतिम निर्णय येईपर्यंत राज्यात नोकरभरती करू नये. नोकरभरती प्रक्रिया पूर्ण झालेल्या मराठा उमेदवारांना त्वरित नोकऱ्या द्याव्यात. कोपर्डी व तांबडी गुन्हेगारांना कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करावेत. मराठा समाजाचे शैक्षणिक प्रश्न, वसतीगृहे, शुल्क प्रतिपूर्ती हे प्रश्न मार्गी लावावेत, असेही ठराव मंजूर करण्यात आले. 
 
मुंबई क्रांती मोर्चाचे समन्वयक राजन घाग, प्रफुल्ल पवार, अभिजित घाग, रुपेश मांजरेकर, विवेक सावंत, नामदेव पवार, बलराम भडेकर, विलास सुद्रीक आणि इतर समन्वयक यावेळी हजर होते. आमदार विनायक मेटे, निर्मल कुमार देशमुख, ऍड श्रीराम पिंगळे, विजय घोगरे, सुरेश पाटील यांनी बैठकीस मार्गदर्शन केले.

Ashok Chavan withdraw Demand in the meeting of Maratha protesters

----------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )