वास्तविक साहित्यालाच माणूसपणाचा गंध - दिग्दर्शक संतोष मिजगर 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 फेब्रुवारी 2020

'आठवांच्या धुऱ्यावर' आणि "आभाळ' या दोन पुस्तकांचे प्रकाशन

ठाणे : वास्तवाशी भान असलेल्या साहित्याला खऱ्या अर्थाने वलय चिटकलेलं असतं. हे वलय जेव्हा शब्दबद्ध होतं, तेव्हा त्याला आपलेपणाचं बाळसं लागतं. या बाळशातून निर्माण झालेला प्रत्येक शब्द सृष्टीच्या निर्मितीसाठी आधारवड बनण्याचं काम करतो. त्यामुळे साहित्य हे वास्तव जीवनाशी निगडित असलं, तर त्याला माणूसपणाचा गंध असतो. साहित्यनिर्मितीमध्ये वास्तविकतेला महत्त्वाचे स्थान आहे, असे मत सिने-दिग्दर्शक संतोष मिजगर यांनी व्यक्त केलं. राजू रणवीर यांच्या "आठवांच्या धुऱ्यावर' या कथासंग्रह आणि "आभाळ' या कवितासंग्रहाच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते. 

ठाण्याच्या मराठी ग्रंथसंग्रहालयात संपन्न झालेल्या या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून डॉ. जयप्रकाश घुमटकर यांची प्रमुख उपस्थिती होती. जयपाल पाटील, ललिता गवांदे, नीता राऊत, पत्रकार संदीप काळे, संतोष मिजगर, जयशील मिजगर आणि राजकुमार सुर्वे इत्यादी मान्यवर या वेळी उपस्थित होते. 

हेही वाचा - एक किस पाडू शकेल तुम्हाला आजारी, भयंकर आजारी...

महाराष्ट्रातील खरं साहित्य ग्रामीण भागातल्या लेखणीमध्ये दडलेलं आहे. अनेक वेळा चांगलं साहित्य येऊनसुद्धा त्याला न्याय मिळत नाही. या दोन पुस्तकांच्या निमित्ताने मराठी रसिकाला चांगलं साहित्य मिळणार आहे, याचा मला आनंद वाटतो. घडलेलं चांगल्या पद्धतीने शब्दबद्ध करण्याची कला मराठी लेखकालाच खऱ्या अर्थाने अवगत झाली आहे. ग्रामीण भागात असलेलं साहित्य शहरी वातावरणाशी जेव्हा समरस होतं, तेव्हा तेथे आधुनिक विचारांची नांदी पेरण्याचं काम सुरू झालेलं असतं, असंही या वेळी मिजगर म्हणाले. 

पहिलं पुस्तक ज्या वेळी आम्ही प्रकाशित करतो, त्यासाठी शासकीय अनुदान मिळतं ते अजूनही अनेक लेखकांना माहीत नसल्याची खंत ज्येष्ठ कवी जयपाल पाटील यांनी कार्यक्रमात बोलताना व्यक्त केली. 

महत्त्वाची बातमी - 'या' कर्मचाऱ्यांना मिळणार हक्काची घरे

तुम्ही पोस्टात काम करता आणि एवढं लेखन कधी केलं आहे, असा प्रश्न बऱ्याचदा मला विचारला जातो. तर त्यांना मी सांगतो, जेव्हा लेखक लिहितो तेव्हा काळवेळ माहीत नसते किंवा वेळेचं असं काही नियोजन नसतं. जेव्हा एखादी घटना घडते, ती मनाला बोचते, तेव्हाचं लेखक त्या कथेचा दोन्ही अंगांनी विचार करून आपलं मत मांडत असतो. मला कथासंग्रह लिहिण्यासाठी जवळजवळ दहा वर्षे लागलेली आहेत, असं मनोगत लेखक कवी राजू रणवीर यांनी व्यक्त केलं. 

लेखकाचे वडील शेतमजूर होते. त्यामुळे त्यांनी जे आयुष्य जगलेलं आहे, ते त्यांनी ग्रामीण भाषेत मांडलं आहे. असे राजकुमार सुर्वे बोलताना म्हणाले. 

athvanchya dhuryawar and aabhal book launched in thane by sandip kale

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: athvanchya dhuryawar and aabhal book launched in thane by sandip kale