एटीएममध्ये ज्येष्ठांना फसवणारी टोळी जाळ्यात 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 डिसेंबर 2019

बॅंकेत किंवा एटीएम केंद्रात पैसे काढण्यासाठी तसेच, रक्कम भरण्यासाठी येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना मदत करण्याच्या बहाण्याने लुबाडणारी टोळी ठाणे गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने जेरबंद केली आहे.

ठाणे : बॅंकेत किंवा एटीएम केंद्रात पैसे काढण्यासाठी तसेच, रक्कम भरण्यासाठी येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना मदत करण्याच्या बहाण्याने लुबाडणारी टोळी ठाणे गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने जेरबंद केली आहे. परवेझ शेख, प्रदीप पाटील आणि किरण कोकणे अशी अटकेत असलेल्या आरोपींची नावे असून हे तिघेही कल्याणमधील म्हारळ येथील रहिवासी आहेत. एटीएममधून पैसे काढण्यासाठी मदत करण्याच्या बहाण्याने पासवर्डची माहिती घेऊन हे टोळके ग्राहकांच्या खात्यातील रक्कम लंपास करण्यासह डेबिट कार्डवरून खरेदी करीत असत. त्यांच्याकडून तीन पिस्तुले व 10 काडतुसेदेखील हस्तगत केली आहेत. 

उल्हासनगर भागात काहीजण पिस्तूल घेऊन येणार असल्याच्या माहितीवरून गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक अविराज कुराडे आणि पोलिस नाईक अमोल देसाई यांनी सापळा रचला होता. त्यानुसार, परवेझ, प्रदीप आणि किरणला ताब्यात घेतले. त्यांच्याकडून तीन पिस्तूल आणि 10 काडतुसे जप्त करण्यात आली. या त्रिकुटाची सखोल चौकशी केली असता त्यांनी बॅंक व एटीएम केंद्राबाहेर अनेक ग्राहकांना लुबाडल्याचे उघडकीस आले.

एटीएमबाहेर उभे राहून ज्येष्ठ नागरिक किंवा ज्यांना एटीएम केंद्रातून पैसे काढता येत नाही, अशा नागरिकांना हेरून हे भामटे फसवणूक करीत असत. अशाप्रकारच्या 15 तक्रारी पोलिसांकडे आलेल्या आहेत. या टोळीने आणखीदेखील काही जणांची फसवणूक केली असल्याची शक्‍यता असल्याने नागरिकांनी संपर्क साधावा. त्याचबरोबर, ज्येष्ठांनी पैसे काढण्यासाठी सोबत विश्‍वासू व्यक्तीला न्यावे आणि गोपनीय पासवर्ड कुणालाही कळणार नाही, अशा तऱ्हेने खबरदारी घेण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. 

फसवणुकीची मोडस ऑपरेंडी 

बॅंकेत येणाऱ्या ज्येष्ठ ग्राहकांना रक्कम मोजून देण्याचे भासवून आपल्याकडील रद्दी कागदाचे बंडल सोपवून फसवणूक केली जात असे; तर एखादी व्यक्ती एटीएम केंद्रात आल्यानंतर मदतीच्या बहाण्याने डेबिट कार्ड घेऊन पासवर्ड माहिती करून घेत. त्यानंतर संबंधित व्यक्ती एटीएम केंद्रातून निघून जाताना ही टोळी त्यांच्या कार्डची अदलाबदली करीत. नंतर त्या कार्डवरून रक्कम काढण्यासह शॉपिंगदेखील करीत. पोलिसांनी या भामट्यांचे मोबाईलचे लोकेशन काढले असून 22 जानेवारी ते 16 नोव्हेंबर 2019 या कालावधीत ते उपस्थित असलेल्या ठिकाणांचा माग काढण्याचे ठरवले आहे. हे भामटे खंडाळा, चाकण, खेड, मावळ, हवेली, पिंपरी, चिंचवड, खोपोली, पनवेल, लोणावळा, नाशिक, सिन्नर, जुन्नर असे संपूर्ण राज्यभर आणि गोव्यातही उपस्थित असल्याचे उघडकीस आले आहे. 

web title : At the ATM, the gangs who cheat the seniors got arrested


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: At the ATM, the gangs who cheat the seniors got arrested