टाइम बाँब शाळेजवळ ठेवणाऱ्या त्रिकुटाला अटक

Crime
Crime

नवी मुंबई - कळंबोलीतील सुधागड शाळेजवळ टाइम बाँब ठेवणाऱ्या त्रिकुटाला नवी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. शाळेजवळ राहणाऱ्या एका विकसकाकडून दोन कोटींची खंडणी उकळण्याच्या उद्देशाने त्याला धमकावण्यासाठी त्याच्या घराजवळ कमी क्षमतेचा बाँबस्फोट घडविण्याचा त्यांचा कट होता. या तिघांपैकी एकाच्या घरातून पोलिसांनी आणखी एक टाइम बाँब जप्त केला आहे, पोलिस आयुक्त संजय कुमार यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

सुशील प्रभाकर साठे (३५), मनीष लक्ष्मण भगत (४५)आणि दीपक नारायण दांडेकर (५५) अशी या तिघांची नावे आहेत. १७ जूनला सुधागड शाळेजवळ हा बाँब आढळला होता. या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिस आयुक्तांनी विशेष तपास पथक स्थापन केले होते. या पथकाने तांत्रिक तपास; तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे प्रथम साठे याला पुण्यातून; तर भगत आणि दांडेकर यांना उलवेनजीकच्या कोंबडभुजे येथून अटक केली.

या प्रकरणातील मुख्य आरोपी दांडेकर याच्यावर २५ लाखांचे कर्ज आहे. सुशील साठे हा पुण्यातील असून त्याला दुर्धर आजार आहे. दांडेकर पूर्वी गावातील श्रीमंत व्यक्तीत गणला जात होता. त्याच्या वडिलांकडे खाणीतील दगड फोडण्यासाठी स्फोट घडविण्यासाठी लागणारा परवाना होता. त्यासाठी कोणती स्फोटके लागतात, याची माहिती त्याला होती. त्याआधारे त्याने टाइम बाँब बनवले होते.

पोलिस ठाण्यात नोंद नाही
कंळबोली बाँबप्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी अटक केलेला सुशील साठे हा कोंढवे धावडे येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) प्रवेशद्वाराजवळील परिसरामध्ये राहतो. साठे हा दुर्धर आजाराने ग्रस्त असून त्याच्यावर मोठ्या प्रमाणात कर्ज आहे. कर्जबाजारीपणातून बाहेर पडण्यासाठीच त्याने मनीष भगत व दीपक दांडेकरच्या मदतीने कमी क्षमतेचे बाँबस्फोट घडवून बांधकाम व्यावसायिकास घाबरवून, धमकावून पैसे उकाळण्याचा कट रचला होता. साठे यास कोंढवे-धावडे येथून तपासासाठी ताब्यात घेतले. मात्र याबाबत उत्तमनगर पोलिस ठाण्यामध्ये कोणत्याही प्रकारची नोंद नाही. ‘‘नवी मुंबईच्या गुन्हे शाखेच्या पथकाने साठे यास ताब्यात घेतले. त्याविषयी त्यांनी आम्हाला कुठलीही कल्पना दिली नव्हती, त्यामुळे त्याचा आमच्या स्टेशन डायरीमध्ये उल्लेख नाही,’’ असे उत्तमनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक उदयसिंग शिंगाडे यांनी स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com