पबवर नववर्षाची धुंदी 

अर्चना राणे-बागवान
शनिवार, 29 डिसेंबर 2018

नवी मुंबई : नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी एकीकडे इमारतीच्या गच्चीपासून नजीकच्या पर्यटनस्थळापर्यंतचे बेत आखले जात असतानाच नवी मुंबईतील पब आणि रेस्ट्रोबारने ग्राहकांसाठी सवलतीच्या आकर्षक पायघड्या अंथरण्यास सुरुवात केली आहे. हजार रुपयांपासूनचे प्रवेश शुल्क, मद्यावर अनेक ऑफर्स, सरप्राईज गिफ्ट अशी उधळण असल्याने तरुणाईची पावलेही पबकडे वळू लागली आहेत. 

नवी मुंबई : नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी एकीकडे इमारतीच्या गच्चीपासून नजीकच्या पर्यटनस्थळापर्यंतचे बेत आखले जात असतानाच नवी मुंबईतील पब आणि रेस्ट्रोबारने ग्राहकांसाठी सवलतीच्या आकर्षक पायघड्या अंथरण्यास सुरुवात केली आहे. हजार रुपयांपासूनचे प्रवेश शुल्क, मद्यावर अनेक ऑफर्स, सरप्राईज गिफ्ट अशी उधळण असल्याने तरुणाईची पावलेही पबकडे वळू लागली आहेत. 

मुंबईप्रमाणेच नवी मुंबई हे कॉस्मोपोलिटीन शहर बनत आहे. त्यामुळे येथेही आधुनिक संस्कृतीचा अविभाज्य घटक असलेल्या पबची संख्या वाढत आहे. तरुणाईच्या सेलिब्रेशनची व्याख्याच सध्या संगीत, नृत्य, मद्य आणि चमचमीत खाद्य या चौकटीत बसवली गेल्याने 31 डिसेंबरला पब, लाऊनज विविध सवलतींची खैरात घेऊन नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी सज्ज झाले आहेत. 

न्यू इअर पार्टीसाठी एका व्यक्तीसाठी हजार रुपये, महिला, मुलींच्या ग्रुपसाठी दोन ते तीन हजार, पुरुषांच्या ग्रुपसाठी अडीच ते चार हजार तर जोडप्यासाठी चार ते सहा हजार रुपयांपर्यंत शुल्क आकारले जात आहे. कॉकटेल, मॉकटेल, लिकर यावर अनेक ऑफर्सही आहेत. लाईव्ह म्युझिक आणि डान्स फ्लोअरची सोय केली आहे. बेस्ट ड्रेस, बेस्ट कपल, बेस्ट डान्सर निवडून त्यांच्याकरता सरप्राईज गिफ्ट्‌सही ठेवली आहेत. 

सुरक्षेचे काय? 
गेल्या वर्षी 28 डिसेंबरला मुंबईतील कमला मिल कंम्पाऊंड येथील पब आणि रेस्तराला लागलेल्या आगीत 14 जणांचा मृत्यू झाला होता. या पबमध्ये अग्निसुरक्षा, आपत्कालीन सुटकेचे मार्ग याकडे डोळेझाक करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील पबमध्ये येणाऱ्या ग्राहकांच्या सुरक्षेवरही प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. याबाबत पोलिस उपायुक्त डॉ. सुधाकर पाठारे यांनी सांगितले की, "पब, लाऊनज, रेस्ट्रोबारमध्ये कुठलीही अनुचित घटना घडू नये, याकरता घेण्यात येणाऱ्या सुरक्षेची पूर्ण जबाबदारी संबंधित व्यवस्थापनाची असेल.' 

विविध पब व्यवस्थापनांकडे याबाबत विचारणा केली असता, सुरक्षेसंदर्भात व्यवस्था करण्यात येणार आहे, असे उत्तर देण्यात आले; मात्र नेमकी सुरक्षा कशी असेल याबाबत सांगणे व्यवस्थापनांनी टाळले. 

पूर्व नोंदणीशिवाय प्रवेश दिला जाणार नाही. पार्टीसाठी येणारी प्रत्येक व्यक्ती, ग्रुपची प्रवेशद्वारावरच तपासणी केली जाईल. मद्य सेवनासाठी वयोमर्यादेचा पुरावा सोबत आणण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. कोणीही गैरवर्तन करताना दिसल्यास त्याला त्वरित बाहेरचा रस्ता दाखवला जाईल. 
- प्रतिनिधी, "स्मॅश', 
नवी मुंबई पब एक्‍स्चेंज व्यवस्थापन 

लेट नाईट पार्टीसाठी आवश्‍यक परवानगी घेण्यात आल्या आहेत. व्यवस्थापनामार्फत सुरक्षेसाठीही उपाययोजना करण्यात आल्या आहेत. 
- दीपक नाडार, 
व्यवस्थापक, टाईट पब 

Web Title: Attraction of Pub for New Year Celebration