जागतिक सोरायसिस जनजागृती महिना - सोरिअ‍ॅसिस रुग्णांनी अशी घ्या त्वचा आणि केसांची काळजी

भाग्यश्री भुवड
Friday, 14 August 2020

दर वर्षी ऑगस्ट महिना हा जागतिक पातळीवर सोरायसिस जनजागृती महिना म्हणून पाळला जातो. मात्र, अजुनही या आजाराविषयी अधिक लोकांना माहिती नाही.

मुंबई : दर वर्षी ऑगस्ट महिना हा जागतिक पातळीवर सोरायसिस जनजागृती महिना म्हणून पाळला जातो. मात्र, अजुनही या आजाराविषयी अधिक लोकांना माहिती नाही. 

रक्तामधील पांढऱ्या पेशींपैकी ‘टी’ लिम्फोसाइटमध्ये काही बदल होऊन त्याचा परिणाम त्वचेच्या अस्तरामधील पेशींमध्ये होतो. यामुळे त्वचेचा एक स्तर निर्माण होण्यास नेहमीपेक्षा कमी वेळ लागतो आणि खवल्यांप्रमाणे जाडीभरडी त्वचा तयार होऊन लालसर रंगाचे चट्टे त्वचेवर दिसू लागतात. तसंच या चट्टय़ांवर रुपेरी पांढरट पापुद्रेही येतात.

विशेषत: गुडघे, कोपर, कंबर, पाठ, डोक्यावरील त्वचा इथे सुरुवातीला सोरिअ‍ॅसिसचे चट्टे दिसू लागतात. आनुवंशिकता, घर्षण, कुठल्याही प्रकारची इजा, घशाचे जंतुसंसर्ग आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मानसिक ताण यापैकी कुठलं तरी कारण सोरिअ‍ॅसिस होण्यामागे नक्कीच असतं. फक्त तळहात-तळपायांवर भेगा पडू शकतात. त्यावर देखील रुपेरी पापुद्रा तयार झालेला असतो.

सोरिअ‍ॅसिसच्या दुसऱ्या प्रकारात काख, जांघा, स्तनाखालील त्वचा अशा ठिकाणी चट्टे उमटतात. या प्रकारामध्ये मात्र प्रचंड खाज सुटते. सोरिअ‍ॅसिसमध्ये हाताची आणि पायांची नखेही खराब होऊ शकतात. कमी प्रमाणात पोटात घ्यायची औषधं, नॅरो बॅण्ड यूव्हीबी किरणोपचार, सिमर लेजर यामुळे बऱ्याच प्रमाणात सोरिअ‍ॅसिसला नियंत्रणात ठेवता येतं.

सोरिअ‍ॅसिसची लक्षणे... 

- त्वचेवर लालसर सूज असणारे चट्टे येणे
- चट्ट्यांभोवती खाज येणे, वेदना होणे, आग होणे
- चट्ट्यांवर पांढरट रंगाचे पापुद्रे येणे
- खाजवल्यास पापुद्रे भूसा होऊन खाली पडणे
- सांध्यामधील वेदना व सूज

आजार वाढीस कारणीभूत गोष्टी... 

- मानसिक ताणतणाव
- धुम्रपान तसेच मद्यपान करणे
- त्वचेवर भाजणे अथवा एखादी जखम होणे
- इतर आजारांवरील औषधांचा परिणाम
- त्वचा आणि केसांची काळजी कशी घ्याल ?
- त्वचा आणि केसांच्या स्वच्छतेकरिता सौम्य उत्पादनांचा वापर करा
- त्वचेला नियमित मॉईश्चराईज करा.
- तीव्र सुर्यप्रकाश तसेच अतिनील किरणांपासून त्वचा आणि केसांचे संरक्षण करा
- त्वचा कोरडी पडणार नाही याची काळजी घ्या
- त्वचेला हानी पोहोचणार नाही तसेच जखम होणार नाही याची पुरेपुर काळजी घ्या
- सतत खाजवणे टाळा. याकरिता त्वचारोग तज्ञांच्या सल्ल्यांने मलम तसेच औषधांचा वापर करा.
- मध आणि हळद या दोन्ही गोष्टींचा वापर त्वचेवर करु शकता.
- दिवसातून एकदाच अंघोळ करा. त्याकरिता सौम्य साबणाचा वापर करा.
- त्वचा घासू नका.
- आपल्या सोबत नेहमी मॉईश्चरायझर बाळगा. जेव्हा त्वचेमध्ये कोरडेपणा जाणवेल त्यावेळी त्याचा त्वरीत वापर करणे फायदेशीर ठरेल.
- नारळाच्या तेलामध्ये कोरफडीचा गर मिसळून घरच्या घरी मॉईश्चरायझर बनवू शकता.
- केस विंचरताना ते ताणू नका.
- केसांकरिता इलेक्ट्रॉनिक मशीनचा वापरावर मर्यादा आणा. हेअर स्टाईल करताना उत्पादनांचा वापर काळजीपुर्वक करा.
- हेअर कलर करण्यापुर्वी दोन दिवस व नंतरचे दोन दिवस शॅम्पुचा वापर करू नका.
- हाताची, पायाची नखं स्वच्छ ठेवा.
- झोपताना त्वचेवर पेट्रोलिअम जेल तसेच ऑलिव्ह ऑईलचा वापर करू शकता
- संतुलित आहार आणि व्यायामाला प्राधान्य द्या.

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: August is celebrated globally as Psoriasis Awareness Month