मुख्यमंत्र्यांच्या ट्विटमध्ये औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर; उपमुख्यमंत्र्यांची मात्र सावध प्रतिक्रिया

पूजा विचारे
Thursday, 7 January 2021

 उद्धव ठाकरे यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन केलेल्या ट्विटमध्ये औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा करण्यात आला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर भाष्य केलं आहे. 

मुंबईः सध्या औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा चांगलाच गाजतोय. त्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन केलेल्या ट्विटमध्ये औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा करण्यात आला. त्यावर काँग्रेसने आक्षेप नोंदवला. बाळासाहेब थोरात यांनी आक्षेप नोंदवत नावं बदलून विकास होतो का, असा सवाल उपस्थित केला. राज्यात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये आणखी एक पक्ष आहे. शिवसेना आणि काँग्रेसनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर भाष्य केलं आहे. 

अजित पवार म्हणाले की, नामांतराच्या विषयी एकत्र बसून चर्चा करु आणि योग्य तो मार्ग काढू. मुंबईत माध्यमांशी बोलताना अजित पवारांनी वेगवेगळ्या विषयांवर भाष्य केलं आहे. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवर औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा करण्यात आला. त्यानंतर काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी यावर आक्षेप नोंदवला आणि नामांतराचा मुद्दा किमान समान कार्यक्रमात नाही असं म्हटलं. बाळासाहेब थोरात यांनी आक्षेप नोंदवल्यानंतर मित्रपक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचं यावर काय मत आहे, अशी विचारणा अजित पवारांना करण्यात आली. 

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या करण्यासाठी येथे क्लिक करा.

त्यावर अजित पवार म्हणाले की, गेल्या आठवड्यातच मी यावर बोललो होतो. राज्यात तीन पक्षांचे सरकार आहे. किमान समान कार्यक्रम आम्ही तिघांनी ठरवला आहे. तिघांचे सरकार असल्यानं काही विषय कधी निघण्याची शक्यता आहे. त्यामुळे यावर एकत्र बसून चर्चा करुन योग्य पद्धतीचा मार्ग काढू. आज आमची बैठक आयोजित केली आहे. या प्रकरणी नक्की काय झालं. जाणीवपूर्वक गडबड केली का या तपासण्यात येतील. आम्ही एकत्र मार्ग काढू. कधीकधी अशाप्रकारच्या गोष्टी घडत असतात, यामागचं नक्की कारण काय आहे हे विचारुनच त्याची शहानिशा करुनच याविषयावर वक्तव्य करेन.

Aurangabad name change row Sambhajinagar Ajit Pawar CM Uddhav Thackeray balasaheb thorat Maha Vikas Aghadi


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad name change row Sambhajinagar Ajit Pawar CM Uddhav Thackeray balasaheb thorat Maha Vikas Aghadi