जीवदानी देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवास सुरुवात; मंदिराकडून नवरात्रोत्सवात ऑनलाईन दर्शनाची सुविधा

संदीप पंडित
Saturday, 17 October 2020

विरारच्या डोंगरावर असणाऱ्या जीवदानी देवीचे मंदिर कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर 17 मार्चपासून बंद आहे. दरम्यान, शासनाने नवरात्रोत्सवात ही मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या

विरार ः विरारच्या डोंगरावर असणाऱ्या जीवदानी देवीचे मंदिर कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर 17 मार्चपासून बंद आहे. दरम्यान, शासनाने नवरात्रोत्सवात ही मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या दरम्यान शनिवारपासून जीवदानी देवी मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवास विधिवत सुरुवात झाली. त्यानिमित्त माजी महापौर आणि विश्‍वस्त राजीव यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली आहे. यावेळी मंदिरातील गुरुजी आणि विश्‍वस्त उपस्थित होते. शनिवारपासून जीवदानीच्या ऑनलाईन दर्शनाची सोय मंदिर व्यवस्थापनाकडून करण्यात आली आहे. तरी भाविकांनी मंदिर परिसरात न येता जीवदानीचे ऑनलाईन दर्शन घ्यावे, असे आवाहन मंदिर व्यवस्थापनाकडून करण्यात आले आहे. 

जालना व पुण्यात निकृष्ट कोरोना चाचणी किट्स; पॉझिटीव्ह रेट कमी झाल्याचा दरेकरांचा दावा

दरम्यान, शासनाकडून मंदिर उघडण्याची परवानगी मिळाल्यानंतर ही भाविकांच्या सुरक्षेसाठी जीवदानी देवी मंदिर प्रयत्नशील असेल. मंदिर उघडल्यानंतर भाविकांना दर्शनाची वेळ ऑनलाईन आरक्षित करण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला जाईल. आरक्षित केलेल्या वेळेच्या अर्धा तास आधी भाविकांना मंदिर परिसरात उपस्थित राहणे बंधनकारक असेल. त्यानंतर पूर्ण तपासणी करून भाविकांना दर्शनासाठी सोडले जाईल. यासंदर्भातील संपूर्ण माहिती लवकरच समाजमाध्यमातून भाविकांपर्यंत पोहोचवली जाईल, असे उपाध्यक्ष पंकज ठाकूर यांनी सांगितले. जगदंबेचे शक्ती स्वरूप साजरे होणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवात दरवर्षी जीवदानी देवी मंदिरात भाविकांची गर्दी पाहायला मिळते. मात्र, यंदा कोरोना पार्श्‍वभूमीवर मंदिर बंद असल्याने जीवदानी देवीचे दर्शन ऑनलाईन घेऊन शासनाच्या निर्णयात भाविकांनी सहकार्य करावे, अशी विनंती मंदिर व्यवस्थापनाकडून करण्यात आली आहे. त्यासाठी https://www.youtube.com/c/JIVDANIVIRARLIVE आणि www.jivdanidevi.com हे संकेतस्थळ भाविकांसाठी उपलब्ध करून दिले आहेत. 

------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The autumn Navratri festival of Goddess Jeevdani begins Online darshan facility for Navratri from the temple