esakal | बदलापूरचा भुयारी मार्ग गेला पुरात वाहून!
sakal

बोलून बातमी शोधा

बदलापूर ः भुयारी मार्गाची झालेली दुरवस्था. 

पालिका प्रशासन मार्गदुरुस्तीकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप

बदलापूरचा भुयारी मार्ग गेला पुरात वाहून!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : बदलापूर शहरात गेल्या महिनाभर झालेल्या जोरदार पावसामुळे पश्‍चिमेकडील बहुतेक भागात पूरस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे रेल्वे उड्डाणपुलाजवळ असलेल्या भुयारी मार्गाचीही पूर्णपणे वाताहत झाली आहे. वाहतूक कोंडीतून सुटका देणारा महत्त्वाचा मार्गही वाहून गेल्याने वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान, पालिका प्रशासनाचे या भुयारी मार्गाच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाले असल्याचा आरोप भाजप शहराध्यक्ष संभाजी शिंदे यांनी केला आहे.

बदलापुरात पूर्व-पश्‍चिम भागात ये-जा करण्यासाठी वाहनांना उड्डाणपूल हा एकमेव मार्ग उरला आहे. पूर्वी शहराच्या पूर्व-पश्‍चिम भागात ये-जा करण्यासाठी वाहनचालकांना बदलापूर रेल्वेस्थानक फाटक, बेलवली रेल्वे फाटक व सध्याच्या उड्डाणपुलाजवळ असलेला भुयारी मार्ग असे तीन पर्याय होते. उड्डाणपुलाची उभारणी झाल्यानंतर ही दोन्ही रेल्वेफाटके बंद करण्यात आली.

बेलवली येथील भुयारी मार्गामध्ये बारमाही पाणी असल्याने तोही नागरिकांसाठी गैरसोयीचा ठरतो. त्यामुळे बदलापूर पूर्व-पश्‍चिम भागात ये-जा करणाऱ्या वाहनांच्या वाहतुकीची संपूर्ण भिस्त या एकमेव उड्डाणपुलावर आहे. या उड्डाणपुलावर एखादे वाहन बंद पडल्यास काही मिनिटांत मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी होत असते. 
या पार्श्‍वभूमीवर सध्या अस्तित्वात असलेल्या उड्डाणपुलाजवळील भुयारी मार्ग अरुंद असला तरी अनेक दुचाकी व रिक्षा चालक या रस्त्याचा वापर शहराच्या पूर्व-पश्‍चिम भागात ये-जा करण्यासाठी करीत असतात; परंतु गेल्या काही दिवसांपासून या रस्त्याची पूर्णपणे दुरवस्था झाल्याने नागरिकांना या रस्त्याचा वापर करता येत नाही.

नव्याने रस्ता निर्मितीचा मागणी

भुयारी मार्गाच्या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाल्याने त्यांना उड्डाणपुलावरूनच पूर्व-पश्‍चिम भागात ये-जा करावी लागत आहे. नागरिकांची होत असलेली गैरसोय टाळण्यासाठी हा रस्ता नव्याने तयार करण्यात यावा, अशी मागणी बदलापूर पालिकेचे नगराध्यक्ष ऍड. प्रियेश जाधव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली असल्याचे स्थानिक नगरसेवक व भाजप शहराध्यक्ष संभाजी शिंदे यांनी सांगितले.

loading image
go to top