शेतकऱ्यांना आवळा, उद्योजक मित्रांना कोहळा! बाळासाहेब थोरात यांचा घणाघात

सकाळ वृत्तसेवा 
Friday, 25 December 2020

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाताळच्या दिवशी इव्हेंटबाजी करत 9 कोटी शेतकऱ्यांना 18 हजार कोटी रुपये दिल्याचा मोठ्या थाटात गवगवा करत असल्याचा घणाघात महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. 

मुंबई  : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाताळच्या दिवशी इव्हेंटबाजी करत 9 कोटी शेतकऱ्यांना 18 हजार कोटी रुपये दिल्याचा मोठ्या थाटात गवगवा करत असल्याचा घणाघात महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. 

दिल्लीत कडाक्‍याच्या थंडीत एक महिन्यापासून हजारो शेतकरी रस्त्यावर ठाण मांडून बसलेले आहेत. नवीन कृषी कायदे रद्द करावेत, ही त्यांची मागणी आहे. परंतु त्या शेतकऱ्यांशी चर्चा करण्याऐवजी आपण शेतकऱ्यांचे किती कैवारी आहेत. हे दाखवण्यासाठी इव्हेंटबाजी करत प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे महत्व पटवून देण्याचा प्रयत्न केला. वास्तविक पाहता शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी दोन हजार रुपये देण्याची ही योजना म्हणजे शेतकऱ्यांना आवळा देऊन आपल्या उद्योजक मित्रांना कोहळा देणारी योजना आहे, असे थोरात यांनी म्हटले आहे. 

मुंबई परिसरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या वार्षिक 54 हजार कोटी रुपयांसाठी सरकार कर्ज काढते. शेतकऱ्याला वर्षाला 6 हजार रुपये म्हणजे दिवसाला 17 रुपये आणि महिन्याला 500 रुपये होतात. परंतु 9 कोटी शेतकऱ्यांसाठी 54 हजार कोटी रुपये देणाऱ्या मोदी सरकारने 2015 ते 2019 या कालावधीत मूठभर उद्योगपतींचे तब्बल 7,94,354 कोटी रुपयांचे कर्ज (जवळपास 8 लाख कोटी रुपये) राईट ऑफ केले. दुसरीकडे मोदी सरकारने पेट्रोल डिझेलमध्ये आतापर्यंत 25 रुपयांची वाढ केली. खतांच्या किमती वाढवल्या, एमएसपी बंद केली जात आहे, सबसीडी बंद केली. शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च हेक्‍टरी 30 हजार रुपये होता त्यात आज मोठी वाढ झालेली आहे. त्यामुळे वर्षाला 6 हजार रुपये दिले तरी 24 हजार रुपयांची तफावत आहे. असेही थोरात यावेळी म्हणाले. 

 

2014 च्या निवडणूक प्रचारात यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी मोदींनी चाय पे चर्चा केली. त्यातील शेतकऱ्यांनेही आत्महत्या केली. उद्योगपतींसाठी भरमसाठ सवलती, राईट ऑफ केलेल्या कर्जाची रक्कम पाहता शेतकऱ्यांना दिलेली मदत अत्यंत तुटपुंजी असून शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडून मूठभर उद्योगपतींचे हित साधण्याचेच काम मोदी सरकार करत आहे. 
- बाळासाहेब थोरात,
महसूलमंत्री. 

Balasaheb Thorat criticizes Narendra Modi over farmers agitation

----------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Balasaheb Thorat criticizes Narendra Modi over farmers agitation