अमली पदार्थ तस्कर ATS च्या रडारवर; बारा प्रकरणांचा तपास युद्धपातळीवर

अनिश पाटील
Wednesday, 6 January 2021

मुंबई शहरात परराज्यातून मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांची तस्करी सुरू झाली असून, दहशतवादविरोधी पथक (एटीएस)ही सतर्क झाले आहे

मुंबई : शहरात परराज्यातून मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांची तस्करी सुरू झाली असून, दहशतवादविरोधी पथक (एटीएस)ही सतर्क झाले आहे. जोरदार कारवाई करीत 12 गुन्ह्यांचा तपास करण्यास सुरुवात केली आहे. अमली पदार्थांचे कनेक्‍शन हिमाचल प्रदेश, गोवा, बंगळुरू आणि राज्यातील जालना, बीड, चंद्रपूर, नागपूर, पुणे, धुळे येथेपर्यंत पसरल्याचे निदर्शनास आले आहे. 

मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

यापूर्वी राज्य एटीएसच्या चारकोप पथकाने विवेककुमार सिंग (35), सूरज शेलार (39) या दोघांना अटक करीत 564 ग्रॅम चरस जप्त केले आहे. यातील दोन किलो चरस विवेककुमार सिंग याने यापूर्वी एटीएसच्या काळाचौकी कक्षाने अटक केलेल्या ललितकुमार शर्मा याच्याकडून घेतल्याचे निष्पन्न झाले आहे. 20 डिसेंबरला पुणे रेल्वे पोलिसांनी कुलू हिमाचल प्रदेश येथील टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय करणारा ललितकुमार दयानंद शर्मा (50) आणि कौलसिंग रूपसिंग (41) या वाहनचालकाला 34.4 किलो चरससह अटक केली होती. पुढील तपासात अटक आरोपींनी मुंबई, गोवा व इतर शहरांत चरस विक्रीकरिता आणल्याचे उघड झाले. चरसचा पुरवठा महाराष्ट्र आणि मुंबईत मोठ्या प्रमाणात करण्यात येत असल्याचेही उघड झाले. या गंभीर गुन्ह्यांचा पुढील तपास राज्याच्या पोलिस महासंचालकांनी मुंबई एटीएसकडे सोपविला होता. त्यानुसार एटीएसने अनेक पथके तयार करीत ती हिमाचल प्रदेश, गोवा, बंगळुरु, पुणे, नागपूर, जालना, बीड, चंद्रपूर या ठिकाणी रवाना केली. या प्रकरणातील 12 गुन्ह्यांचा तपास एटीएसने करण्यास सुरुवात केली आहे. 

ban chemical smuggler on ATSs radar 12 cases investigated at war level

------------------------------------------- 

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ban chemical smuggler on ATSs radar 12 cases investigated at war level